Supermoon: दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन विशेष दिवसांचा संगम यंदा खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. गुरुवार, 4 डिसेंबर रोजी भारतीय आकाशात एक मोहक आणि दुर्मिळ दृश्य साकार होणार आहे. याच दिवशी आकाशात नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि मोठ्या आकारातील पूर्ण चंद्राचे दर्शन होईल. या प्रभावी दृश्याला जगभरात “सुपरमून” या नावाने ओळखले जाते आणि भारतातूनही ते स्पष्ट दिसणार आहे.
सामान्यतः चंद्र पृथ्वीपासून अंदाजे 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर फिरत असतो. मात्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पृथ्वीशी असलेली जवळीक अधिक असेल. या वेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ सुमारे 3 लाख 57 हजार किलोमीटरपर्यंत कमी होईल. चंद्र इतका जवळ आल्याने तो साधारणपणे 14 टक्के मोठा आणि 30 टक्क्यांनी अधिक उजळ दिसतो, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.
खगोल अभ्यासकांच्या मते, पूर्ण चंद्र जेव्हा पृथ्वीच्या भोवती असलेल्या त्याच्या कक्षेत सर्वात जवळच्या बिंदूवर येतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या या अद्भुत दृश्याला सुपरमून म्हणतात. नेहमीपेक्षा त्याची चमक वाढल्याने तो आकाशात अधिक आकर्षक स्वरूपात झळकतो. आकाशाकडे पाहिल्यावर हा फरक सामान्य लोकांनाही सहज दिसून येतो.
या सुपरमूनचे दर्शन भारतभरातून खुले आकाश असेल त्या ठिकाणावरून सहज घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी सुमारे 5.18 वाजता पूर्व क्षितिजावर उगवेल आणि त्यानंतर संपूर्ण रात्री आकाशात उत्तुंग रूपात राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7.14 वाजेपर्यंत हे दर्शन घेता येणार असल्याने जवळपास चौदा तासांपेक्षाही अधिक वेळ चंद्र आपली चमचमत झळाळी सोडत राहील.
या खगोलीय घटनेचा योग फारच अपवादात्मक असतो. सुपरमून वर्षातून दोन-तीन वेळा जरी दिसला तरी अशा पवित्र आणि शुभ दिवसांच्या संयोगाने दिसणे विरळच. त्यामुळे दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन्ही दिवशी एकाच वेळी असा अद्भुत चंद्र अवतरतोय, याचा अनुभव खगोलप्रेमींना खास ठरणार आहे.
ज्यांना अंतराळ निरीक्षणाची आवड आहे किंवा फक्त सुंदर निसर्गरम्य दृश्य बघण्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी या रात्रीची योजना तयार ठेवणे योग्य ठरेल. मोबाइल कॅमेऱ्यांनी किंवा छोट्याशा दुर्बिणीनेही चंद्राचे हे भव्य रूप सहज टिपता येणार आहे. मुलांना, विद्यार्थ्यांना सुद्धा या निमित्ताने चंद्राच्या कक्षेबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
ज्यांनी या वेळेस चंद्राचे दर्शन चुकवले तर पुढील सुपरमून भारतात 24 डिसेंबर 2026 रोजी दिसेल. त्यामुळे या अद्वितीय चांदण्याच्या रात्रीचा आनंद अवश्य लुटा आणि आकाशाकडे पाहत निसर्गाने दाखवलेल्या या चमत्काराचा साक्षात्कार घ्या.