एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. मात्र या मागणीस नकार देऊन उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. मात्र न्यायालयाचा आदेश धुडकावून लावून राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकारचा वाद आणखी पेटणार असल्याचे चित्र ऐन दिवाळीत निर्माण झाले आहे.
भिवंडीतील एसटी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही आमची काळी दिवाळी असल्याची प्रतिक्रिया संपकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक एसटी कर्मचारी आत्महत्या करत असल्याचा आरोपही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. जोवर एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात येत नाही तोवर हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अशा परिस्थितीत बससेवा बंद असल्यामुळे रिक्षाचालकांनी भाववाढ करून लूट सुरू केल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणीतही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून एसटी सेवा ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळातंर्गत येणाऱ्या एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री पासून पुन्हा एकदा संप पुकारला आहे. परभणी विभागातील परभणी शहर सोडता इतर सर्व ७ आगारातील कर्मचारी संपामध्ये सामील झाले आहेत.
सांगलीतही एसटी कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. एसटी कामगार येत्या १० नोव्हेंबरला मंत्रालयावर कुटुंबियांसह धडकणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. ‘आता रडायचं नाही तर लढायचं’ असे आवाहन पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि शासनातील वाद आता आणखी पेटणार आहे.