केतन अग्रवाल हत्याप्रकरणानंतर सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांबाबत अनेक दावे आणि चर्चा सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांत रंगताना दिसत आहेत. विशेषतः सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च होणार होते, राजस्थानमध्ये आलिशान महाल बुक करण्यात आला होता आणि पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती, अशा बातम्यांनी चांगलीच चर्चा रंगवली होती. मात्र, या सर्व चर्चांना आता सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी पूर्णविराम दिला आहे.
सिया प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रवीण गोयल यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लग्नाच्या खर्चासंदर्भात अनेक खुलासे केले.
प्रवीण गोयल यांनी सांगितले की, 'सिया आणि केतन यांचा विवाह नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, 17 कोटींचा महाल किंवा दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्था केल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. आमच्या आर्थिक क्षमतेनुसारच लग्नाचे नियोजन करण्यात आले होते.'
त्यांनी पुढे सांगितले की, उदयपूरमधील रिसॉर्टमध्ये पाहुण्यांच्या मुक्कामासाठी खोल्या निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यांच्या कुटुंबासाठी सुमारे 70 तर वधूपक्षासाठी 150 ते 160 खोल्यांचे आरक्षण करण्यात आले होते. एका जोडप्यासाठी एका दिवसाचा खर्च जवळपास 81 ते 82 हजार रुपये इतका येत होता. सर्व मिळून कार्यक्रम, जेवण आणि इतर व्यवस्था धरून लग्नाचा एकूण खर्च सुमारे 3 कोटी रुपयांच्या आसपास जाणार होता.
प्रवास व्यवस्थेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. पाहुण्यांच्या सोयीसाठी काही पर्यायांचा विचार करण्यात आला होता. मुंबईहून उदयपूर आणि पुण्याहून उदयपूर असे पर्याय समोर आले होते. मात्र, खर्च आणि वेळेचा विचार करता ते व्यवहार्य वाटले नाहीत.
याऐवजी पुणे ते अहमदाबाद विमानप्रवास आणि तेथून कारने उदयपूरपर्यंत पाहुण्यांना नेण्याचा पर्याय विचाराधीन होता. कोणतेही चार्टर्ड विमान बुक करण्यात आले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या तिकिटांद्वारे काही पाहुण्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन होते, असेही त्यांनी सांगितले.
'मी जास्तीत जास्त 4 ते 5 कोटी रुपये खर्च करू शकलो असतो. माझ्या बहिणीने मुलगी चांगल्या घरात जात असल्याने खर्चाचा फार विचार करू नको, असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी ठराविक मर्यादेपर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेतला होता,' असेही प्रवीण गोयल यांनी सांगितले.