कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गर्भलिंग निदानाचा सुळसुळाट सुरू असताना आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. यात बनावट डॉक्टर, बीएचएमएस डॉक्टर, पोल्ट्री व्यावसायिक यांचा सहभाग असल्याचे उघडकीस झाले आहेत. दरम्यान करवीर पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर पोलिसांनी कळंबा येथील थ्री स्टार लॉजवर छापा टाकून दोन दिवसांपूर्वी महिला एजंटांना अटक केली होती. त्यानंतर या महिलांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपातासाठी कदमवाडी रोडवरील डॉ. चंद्रकांत गायकवाडकडे पाठविले जातात.
यानंतर पोलिसांनी महिलांचे गर्भपात करणाऱ्या सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत गुंडू गायकवाड याला पाठविलेल्या डमी महिलेच्या गर्भपाताची केसपेपर न बनविता तिची पोर्टेबल मशीनने तपासणी केली. यानंतर तिला गर्भपाताची गोळी दिली होती. तिचा गर्भपात करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
तसेच गर्भपातासाठी जमवलेले सोनोग्राफी मशीन, गोळ्या, शस्त्रक्रियेची उपकरणे पोलिसांनी जप्त केली. यावेळी त्याने दोन वर्षांत 300 गर्भपात केल्याची धक्कादायक कबूली दिली. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड याने त्याच्या घराच्या एका भागात हॉस्पिटल थाटले होते. जादा कमाईसाठी डॉ. गायकवाड गर्भपात करत होता. गर्भपातासाठी त्याने 20 ते 25 हजार रुपये घेतल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे.