भरजारी शालू नेसून, पायात चाळ बांधून अन् डोक्यावर पदर घेऊन आपल्या अदाकारीने मन जिंकणाऱ्या नृत्यांगनेने उधळलेल्या पैश्यातून दोन मुलांना उच्च शिक्षण देऊन इंजिनिअर बनवले आहे. कलावंत म्हणून नृत्य सादर करताना शौकीन लोकांनी उधळलेल्या पैश्यातून तिने ही किमया करून दाखवली आहे.
तमाशा बोर्डात कलावंत असलेल्या अनुराधाने प्रचंड आर्थिक अडचण असताना प्रसंगी पोटाला चिमटा देत मुलांना बड्या शहरात शिक्षण दिले आहे. तिची दोन मुले शिकून आता सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तिच्या एका मुलाला चक्क वार्षिक सोळा लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज मिळाले आहे, तर दुसरा मुलगा महिन्याला पन्नास हजार रुपये कमावत आहे. दोन्ही मुले आता आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहेत. मूल कमावती झाली असली तरी संगीत पार्टिच्या माध्यमातून जोडलेल्या सह कलावंतांसोबतच उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्धार तिने केला आहे. विशेष म्हणजे याच महिलेचा आदर्श घेऊन तिच्या सह कलावतांनीदेखील आपल्या मुलांना शिक्षण देऊन अधिकारी बनवण्याचा संकल्प केला आहे. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी शिक्षण तुमचे आयुष्य बदलू शकत हे दाखवणारी ही घटना निश्चितच प्रेरणादायी अशीच आहे.