भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्थानकात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट मजूर नोंदणी केल्याचा आरोप दरेकरांवर केला आहे.
प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे आज विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. तसेच प्रवीण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विधानसभेच्या सभागृहात विरोधकांनी तीन वेळा गोंधळ घातल्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. माता रमाबाई आंबेडकर पलीस ठाण्यात भादवी कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल आहे.