मुंबई क्राइम ब्रँचकडून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याला देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात मिळालेल्या धमकीच्या व्हॉइस नोटची पडताळणी करण्यासाठी तपास पथक पंजाब आणि हरियाणा येथे पाठवण्यात आले होते. संबंधित व्हॉइस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘हेरी बॉक्सर’ अशी सांगत तब्बल 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांना धमकीचा व्हॉइस नोट मिळाल्यानंतर तो तांत्रिक तपासासाठी पंजाब आणि हरियाणा पोलिसांकडे पाठवण्यात आला. तेथील तपासानंतर व्हॉइस नोटमधील आवाज हा हेरी बॉक्सर याचाच असल्याची प्राथमिक पुष्टी मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी रणवीर सिंगचे व्यवस्थापक विजय सुब्रमण्यम यांच्या तक्रारीवरून अधिकृत एफआयआर नोंदवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विजय सुब्रमण्यम यांना +340 या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल करण्यात आला होता. हा देशकोड आयलंड्सशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पैशांची मागणी करत गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रणवीर सिंग याच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून चित्रपट चित्रीकरणासाठी प्रवास करताना विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये आरोपीने इशारा देत मागणी मान्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. “बोललेली गोष्ट मान्य करा, अन्यथा पुढील सात पिढ्या परिणाम लक्षात ठेवतील,” अशा आशयाचा संदेश व्हॉइस नोटमध्ये असल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच काही गोळीबाराच्या घटनांची जबाबदारी स्वीकारल्याचाही दावा संबंधित व्यक्तीने केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या गटाविरोधात नोंदवण्यात आलेली ही दुसरी एफआयआर असून यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये शूटर दीपक शर्मा याचाही समावेश आहे.
सध्या मुंबई क्राइम ब्रँचची अँटी एक्स्टॉर्शन सेल (Anti-Extortion Cell) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून धमकीमागील नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांची चौकशी सुरू आहे. बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करणाऱ्या वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.