देहूगावमध्ये कौटुंबिक वादतून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आलेली आहे. पतीने धारदार हत्याराने पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर स्वत: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पहाटे साडेपाचच्या दरम्यान देहूगाव येथील एका सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली असून यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
चार महिन्यांपूर्वी भाड्याने आले, पहाटे घडलं भयंकर
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 28 वर्षीय शुभांगी आकाश बारस्कर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती 26 वर्षीय आकाश रामदास बारस्कर हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दांपत्य गेल्या चार महिन्यांपासून देहूगावातील एका प्लॅटमध्ये भाड्याने राहत होते.
हेही वाचा-Nagpur: मंदिरात आसरा घेतला… अन् काळाने घाला घातला; दोन भावांचा जागीच मृत्यू
शनिवारी मध्यरात्री दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. हा वाद क्षणात इतका विकोपाला गेला की, आकाशने थेट शुभांगीवर धारदार हत्याराने हल्ला केला. याच हल्ल्यात शुभांगी यांच्या गळ्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीवर हल्ला केल्यानंतर आकाशनेही टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली.
आकाशच्या चौकशीनंतर उलगडणार रहस्य
संबंधित घटनेची माहिती मिळताच देहूरोज पोलिसांनी तातडीने घटनास्थल गाठले आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आकाशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान पोलिस पथक सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे या पती-पत्नीमध्ये नेमका वाद कशावरून झाला आणि या धक्कादायक हत्येमागचे नेमके कारण काय या सर्व गोष्टींचा तपास देहूरोड पोलीस करत असून, आकाशची प्रकृती आणि चौकशीनंतर या घटनेमागचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.