मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू या समुद्रावरील महामार्गावर रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या आकर्षक समुद्रीपुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारून जीव दिला आहे. या थरारक घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि प्रशासनाला हादरवून सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 1.29 वाजण्याच्या सुमारास 28 वर्षीय प्रतिक सुभाष रासकर या तरुणाने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. प्रतिक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी होता. तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित व्यवसाय करत होता. उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण प्रकार घडण्यापूर्वी प्रतिक जेवणासाठी बाहेर जात असल्याचं सांगून आपल्या घरातून बाहेर पडला.
त्यानंतर तो त्याच्या कारसह मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू या समुद्रीपुलावर पोहचला. गाडी तिथेच उभी करून त्याने समुद्रात उडी मारली. त्यानंतर बराच वेळ झाला तरी प्रतिक घरी पोहचला नव्हा या काळजीने कुटुंबियांनी तो हरवला असल्याची तक्रार उलवे पोलिस ठाण्यात दाखल केली. त्याच्या घरच्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीसांनी पुढचा तपास सुरु केला.
त्यानंतर तो अटल सेतू या पुलावर गेल्याचे पुलावरील सीसीटीव्ही फुटेज आणि सुरक्षा रक्षकांमुळे समोर आले. समुद्र परिसरात तसेच किनारपट्टी भागात शोधकार्य सुरू असून अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. त्यामुळे प्रतिक रासकर याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.