Train Harassment: देवदर्शनावरून परतताना भयावह अनुभव! नागपूरच्या महिलांचा ट्रेनमध्ये विनयभंग; मदत न मिळाल्याने थेट रेल्वे रोको आंदोलन

वाराणसीहून नागपूरला परतणाऱ्या महिलांनी दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये छेडछाड, विनयभंग आणि अश्लील वर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. मदत न मिळाल्याने त्यांनी नैनी स्थानकावर रेल रोको आंदोलन केले.

Train Harassment: देवदर्शनावरून परतताना भयावह अनुभव! नागपूरच्या महिलांचा ट्रेनमध्ये विनयभंग; मदत न मिळाल्याने थेट रेल्वे रोको आंदोलन

वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या नागपूरच्या एका कुटुंबाला रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागल्याचा आरोप समोर आला आहे. दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यात महिलांसोबत छेडछाड, विनयभंग आणि अश्लील वर्तन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील हे कुटुंब देवदर्शन करून उत्तर प्रदेशातील वाराणसीहून नागपूरकडे परतत होते. त्यांनी आरक्षित डब्यात जागा घेतली होती. मात्र, गाडी सुटल्यानंतर काही वेळातच आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवासी घुसल्याचा आरोप करण्यात आला आहे. डब्यात क्षमतेपेक्षा अनेकपटीने गर्दी झाल्याने प्रवाशांना उभे राहण्याचीही जागा उरली नव्हती.

याच गर्दीचा फायदा घेत काही व्यक्तींनी महिलांशी धक्काबुक्की केली, अश्लील शेरेबाजी केली तसेच विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसला असून प्रवास अत्यंत भीतीच्या वातावरणात करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर रेल्वे हेल्पलाइन १३९ वर संपर्क साधण्यात आला. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरूनही रेल्वे प्रशासनाकडे मदतीची विनंती करण्यात आली. याशिवाय रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आल्याचा दावा महिलांनी केला आहे. मात्र, वेळेवर कोणतीही ठोस मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, परिस्थिती असह्य झाल्यानंतर नैनी रेल्वे स्थानकावर संबंधित महिलांनी थेट रेल्वे इंजिनासमोर जाऊन रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनानंतरच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची हालचाल सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

महिलांच्या आरोपानुसार, तक्रार केल्यानंतरही उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. उलट, "आरोपी तुम्हीच ओळखा," अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेमुळे आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांची वाढती गर्दी, सुरक्षा यंत्रणेची कार्यपद्धती आणि महिला प्रवाशांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आरक्षित डब्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी प्रवासी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू असून रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सविस्तर भूमिका येणे अपेक्षित आहे. महिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे देशातील रेल्वे प्रवासातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number