मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी रात्री मोठी कारवाई करत टिटवाळ्यातून तब्बल पाच कोटी रुपयांच्या ड्रग्ज एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणात 35 वर्षीय ‘ड्रग्ज क्वीन’ महिलेला अटक करण्यात आली असून ती मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेची ओळख पॉल अशी झाली आहे. ती टिटवाळ्यात भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ती केरळमधील पॉल आडनावाच्या व्यक्तीशी विवाहबद्ध झाली होती, मात्र सध्या दोघे एकत्र राहत नाहीत. तिला रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून 22 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर 5,000 ड्रग्ज गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या गोळ्या रेव्ह पार्टी आणि इतर कार्यक्रमांमध्ये पुरवठा करण्यासाठी आणल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासात या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्यीय टोळीशी जोडले गेले आहेत.
याआधी 14 एप्रिल 2026 रोजी घाटकोपर युनिटने साकीनाका परिसरातून 200 ड्रग्ज गोळ्या जप्त करून इरफान अन्सारीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने या गोळ्यांचा पुरवठा पॉलकडून झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल डेटाच्या आधारे टिटवाळ्यातील तिच्या घरापर्यंत धाड टाकली.
पोलिसांनी पॉलकडून अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्डही जप्त केले आहेत. तिच्या फोनमधील संपर्क आणि संदेशांची तपासणी सुरू असून या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांत ड्रग्जसंबंधित कारवायांमध्ये वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अंमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ कायद्या कायद्याअंतर्गत आरोपी महिलेला दीर्घकालीन कारावास आणि मोठ्या दंडाची शिक्षा होऊ शकते.