मुंबईत ऑनलाइन शॉपिंगच्या आमिषाला बळी पडत एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची तब्बल 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वस्तात ड्रेस मिळण्याच्या जाहिरातीने सुरुवात झालेली ही फसवणूक काही दिवसांतच मोठ्या आर्थिक नुकसानीत परिवर्तित झाली.
देवनार परिसरातील या प्रकरणात, पीडित महिलेला फेसबुकवर केवळ 299 रुपयांत आकर्षक ड्रेस मिळण्याची जाहिरात दिसली. या ऑफरने आकर्षित होऊन तिने ड्रेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ ड्रेसची किंमत मागण्यात आली, त्यामुळे तिला संशय आला नाही.
मात्र, खरेदी प्रक्रियेनंतर ठगांनी विविध कारणे सांगत पैशांची मागणी सुरू केली. शिपिंग चार्ज, जीपीएस शुल्क, ट्रॅकिंग फी, व्हेरिफिकेशन कोड आणि पत्त्याची पुष्टी अशा वेगवेगळ्या नावाखाली पैसे मागितले गेले. विश्वासात घेण्यासाठी ठगांनी सतत संपर्क ठेवला आणि पाच दिवसांत महिलेकडून एकूण 1 लाख रुपये उकळले.
या सर्व प्रक्रियेदरम्यान ठगांनी पीडितेला आश्वासन दिले की, ड्रेस डिलिव्हरीनंतर मोठा हिस्सा परत (रिफंड) केला जाईल. या विश्वासावर तिने पैसे पाठवले. मात्र, पैसे दिल्यानंतरही ड्रेस न मिळाल्याने आणि संपर्क कमी होत गेल्याने तिला फसवणुकीची जाणीव झाली.
घडलेल्या प्रकारानंतर महिलेने तत्काळ सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर देवनार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक चौकशीत या फसवणुकीसाठी फेसबुक जाहिरात, व्हॉट्सॲप क्रमांक आणि बनावट डिलिव्हरी एजंटचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवताना नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.