अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि अघोरी उपचारपद्धतीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रेट्याखेडा गावात अवघ्या 15 दिवसांच्या नवजात बालिकेवर ‘डम्मा’ नावाच्या पारंपरिक उपचाराच्या नावाखाली अमानुष प्रकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोटदुखी आणि पोट फुगल्याचा त्रास कमी होईल, या समजुतीतून बालिकेच्या पोटावर तापवलेल्या विळ्याने 11 ते 12 चटके देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेला काही दिवसांपासून पोट फुगण्याचा त्रास होत होता. तिच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, गावातील काही जणांच्या सल्ल्यानुसार कुटुंबाने ‘डम्मा’ या स्थानिक उपचारपद्धतीचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर यांनी चुलीवर विळा तापवून बालिकेच्या पोटावर वारंवार चटके दिल्याचे सांगितले जात आहे.
या अमानुष प्रकारामुळे नवजात बालिकेला तीव्र वेदना होऊ लागल्या. तिची प्रकृती बिघडताच कुटुंबीयांनी तिला तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी बालिकेवर उपचार सुरू केले असून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीणकुमार पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भुलई जामुनकर यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मेळघाटातील काही दुर्गम भागांमध्ये आजही लहान मुलांचे पोट फुगणे, ताप किंवा इतर किरकोळ आजारांवर ‘डम्मा’ देण्याची अंधश्रद्धेवर आधारित उपचारपद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारामुळे लहान मुलांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भाजल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो, तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता असते.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत मेळघाटात अशा स्वरूपाची ही तिसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी दुर्गम भागांत जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अंधश्रद्धा आणि अपुर्या आरोग्यविषयक माहितीमुळे निष्पाप बालकांचे जीव धोक्यात येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईबरोबरच व्यापक जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.