Margshirsh Guruwar 2025: या मार्गशीर्षात काय करावं, काय टाळावं? आणि कोणत्या दानाला खास महत्व? जाणून घ्या

मार्गशीर्ष महिना सुरू होत असून या काळात श्रीकृष्ण व महालक्ष्मीची पूजा, सात्विक व्रत आणि दानधर्माला विशेष महत्व आहे. पाळावयाचे नियम आणि या महिन्यातील दानाचे महत्व जाणून घ्या.

Margshirsh Guruwar 2025:  या मार्गशीर्षात काय करावं, काय टाळावं? आणि कोणत्या दानाला खास महत्व? जाणून घ्या

Margshirsh Guruwar 2025: हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानला जाणारा मार्गशीर्ष महिना उद्यापासून सुरू होत आहे. भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित हा महिना संपूर्ण भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या काळात व्रत, पूजा, दानधर्म आणि सात्विक जीवनशैलीचे पालन करणाऱ्या भक्तांना विशेष पुण्य मिळते, अशी पुराणांमध्ये स्पष्ट मांडणी आहे. त्यामुळे मार्गशीर्षात कोणते नियम पाळावेत आणि कोणती दाने अधिक फलदायी ठरतात, याबद्दल जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

स्कंदपुराणातील वैष्णवखंडात भगवान श्रीकृष्ण स्वतः मार्गशीर्ष महिना आपला ‘अत्यंत प्रिय’ असल्याचे सांगतात. त्यामुळे या काळात श्रीकृष्णपूजेला आणि मंत्रजपाला अत्यंत शुभ मानले जाते. पहाटे लवकर उठून स्नान केल्यास आणि मन शांत ठेवून देवपूजा केल्यास श्रीकृष्णाची विशेष कृपा लाभते, अशी लोकमान्यता आहे.

मार्गशीर्ष महिन्यात सात्विकतेचे विशेष महत्त्व आहे. या दिवसांत मांसाहार, तामसिक पदार्थ, शिळे किंवा थंड अन्न यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. शरीर स्वच्छ, मन शांत आणि विचार पवित्र ठेवणे हा या महिन्याचा मुख्य उद्देश मानला जातो. जास्त मसालेदार पदार्थ, जिऱ्याचा उपयोग किंवा तिखट पदार्थ कमी प्रमाणात खावे, असेही शास्त्र सांगते. या काळात फळाहार, हलका सात्विक आहार किंवा एकभोजनाचा नियमही काही भक्त पाळतात.

हेही वाचा: Margshirsh Guruwar 2025 : मार्गशीर्षातला पहिला गुरुवार कधी? 20 की 27 नोव्हेंबरला? जाणून घ्या, कलशाची स्थापना कधी आणि कशी करावी

महाभारतातही मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन आढळते. या महिन्यात दीनदुबळ्यांना भोजन देणे, ब्राह्मणांना दक्षिणा देणे आणि आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा आणि व्रत पाळले जाते. पूर्ण विधीने केलेले हे व्रत कुटुंबात सुख, समृद्धी आणि स्थैर्य आणते, असा लोकानुभव सांगतो.

या महिन्यात तुळशीपूजा देखील अत्यंत शुभ मानली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला पाणी देऊन तिच्यासमोर तुपाचा दिवा लावल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. संध्याकाळी मुख्य दाराजवळ दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते. हे दिवे प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात.

हेही वाचा: Vivah Muhurat 2026 Date : लग्नाची तयारी सुरू करा! 2026 मध्ये विवाहासाठी 59 शुभ मुहूर्त; तारखा पाहून घ्या

दानधर्माच्या दृष्टीने मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आहे. गरजूंना अन्न, उबदार वस्त्रे, ब्लँकेट, गूळ, तूप, तांदूळ किंवा कोणत्याही उपयुक्त वस्तू देण्याने मनःशांती मिळते आणि पुण्याची वृद्धी होते. समाजसेवा हा या महिन्याचा मूळ संदेश आहे, असे सांगितले जाते.

याशिवाय, श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास अनाहूत पापांचा नाश होतो, असे धार्मिक ग्रंथ सांगतात.

मार्गशीर्ष महिना भक्ती, सात्विकता आणि दानाचा संदेश देणारा आहे. योग्य नियम पाळून भक्तिपूर्वक केलेले प्रत्येक कर्म या काळात अनेक पटीने फलदायी ठरते, अशी श्रद्धा आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number