पुण्यातील उद्योजक कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात आता आर्थिक व्यवहार, नियोजनबद्ध कट आणि फसवणुकीचे धागेदोरे समोर आल्याने या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी अत्यंत बारकाईने संपूर्ण कट आखल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सिया आणि चेतन यांच्यातील संबंधांबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर सियाने केतनकडून विविध कारणे देत मोठी आर्थिक मदत घेतली होती. खरेदी, लग्नाची तयारी आणि इतर खर्चांच्या नावाखाली मोठी रक्कम घेतल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या पैशांचा वापर चेतनच्या भविष्यातील व्यवसायासाठी करण्याचा दोघांचा विचार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांच्या मते, केतनच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी परिस्थिती शांत झाल्यानंतर पुढील आयुष्याची योजना आखण्यात आली होती. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
याशिवाय, घटनास्थळी वापरण्यात आलेल्या संकेतांबाबतही पोलिसांनी महत्त्वाची माहिती मिळवली आहे. लोहगड परिसरात घडलेल्या घटनेदरम्यान एका विशिष्ट इशाऱ्याचा वापर करण्यात आल्याचा तपासात दावा करण्यात येत आहे. या इशाऱ्यानंतर मुख्य आरोपीने आपली जागा बदलल्याने पुढील घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 18 जूनच्या घटनेपूर्वीही केतनच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता तपासली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका पर्यटनस्थळी घडलेल्या घटनेचाही तपास अधिकारी बारकाईने तपासत आहेत. त्यावेळी संबंधित घटनेला अपघाताचे स्वरूप देण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सहआरोपी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केल्याचेही उघड झाले आहे. घटनास्थळी जाताना आणि तेथून परतताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने वेगवेगळे कपडे वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या हालचालींची पडताळणी सुरू केली आहे.
या प्रकरणात वापरण्यात आलेले वाहन, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या मोबाइलमधील माहितीही पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.