नवी दिल्ली: जेईई मेन 2026 (JEE Main 2026) एप्रिल सेशनसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच 25 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) च्या माहितीनुसार, उमेदवारांना आजपर्यंतच ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून परीक्षा शुल्क भरता येणार आहे. निर्धारित मुदतीनंतर अर्ज प्रक्रियेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनटीएने दिलेल्या वेळापत्रकानुसार जेईई मेन 2026 सेशन 2 म्हणजेच एप्रिल सत्राची परीक्षा 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान देशातील तसेच परदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (Computer Based Test, CBT) घेतली जाणार असून परीक्षेसंबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळ www.jeemain.nta.nic.in वर उपलब्ध आहे.
एप्रिल महिन्यामधील सेशन हे अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी मानले जाते. जानेवारी सत्रात सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, आपला स्कोअर सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच नवीन उमेदवारांसाठी हा शेवटचा पर्याय आहे. सेशन 1 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध आहे. दोन्ही सत्रांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्याचा सर्वोत्तम स्कोअर अंतिम रँकिंगसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
आजच्या अंतिम तारखेपर्यंत अर्ज न केल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मात्र एनटीए 27 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज दुरुस्ती विंडो (Correction Window) सुरू करणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जामधील वैयक्तिक किंवा शैक्षणिक माहितीतील चुका सुधारण्याची संधी मिळेल.
जेईई मेन 2026 सेशन 2 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन सेशन 2 रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन नोंदणी पूर्ण करून अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करावे. पुढे वैयक्तिक, शैक्षणिक आणि परीक्षा संबंधित माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. शेवटी ऑनलाइन शुल्क भरून कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम क्षणाची गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.