अहमदाबाद: भारतीय क्रिकेटचा ‘पॉकेट डायनॅमो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इशान किशनने विजय हजारे ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच दिवशी धावांचा पाऊस पाडत खळबळ उडवून दिली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडला ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिल्यानंतर, इशानने आपला तोच ‘चॅम्पियन’ अवतार 50 षटकांच्या क्रिकेटमध्येही कायम ठेवला. कर्नाटकसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना इशानने अवघ्या 33 चेंडूंमध्ये आपले झंझावाती शतक पूर्ण केले. या स्फोटक खेळीसह तो लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
इशान किशनचा हा फॉर्म केवळ योगायोग नसून त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 स्पर्धेत 500 हून अधिक धावा कुटल्यानंतर, त्याची आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. कर्नाटकविरुद्ध इशानने 39 चेंडूत 125 धावांची अविश्वसनीय खेळी खेळली, ज्यात त्याने 7 चौकार आणि तब्बल 14 उत्तुंग षटकार खेचले. या खेळीमुळे त्याने काही तासांपूर्वीच बिहारच्या वैभव सूर्यवंशीने (36 चेंडू) केलेला विक्रम मोडीत काढला. इशानच्या या खेळीने निवडकर्त्यांनाही सडेतोड उत्तर दिले असून, त्याचे टीम इंडियातील स्थान अधिक भक्कम केले आहे.
इशानच्या खेळीपूर्वी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने 84 चेंडूत 190 धावांची महाकाय खेळी साकारली. वैभवने या खेळीत ए.बी. डिव्हिलियर्सचा सर्वात वेगवान 150 धावांचा जागतिक विक्रम मोडीत काढला आणि लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर ठरण्याचा मान मिळवला. अवघ्या काही तासांतच इशानने त्याला वेगवान शतकाच्या बाबतीत मागे टाकले असले, तरी एकाच दिवशी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा दोन वादळी खेळी पाहणे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरली.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आज ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. झारखंडच्या इशान किशनने कर्नाटकविरुद्ध अवघ्या 33 चेंडूंमध्ये शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने 2024 मध्ये पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने अरुणाचल प्रदेशविरुद्ध केलेल्या 35 चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे, आजच बिहारच्या वैभव सूर्यवंशीनेही अरुणाचल प्रदेशविरुद्ध केवळ 36 चेंडूंत शतकी खेळी साकारली. या दोन्ही युवा खेळाडूंनी युसूफ पठाणच्या 2010 मधील (40 चेंडू) आणि उर्विल पटेलच्या 2023 मधील (41 चेंडू) वेगवान शतकांच्या विक्रमांना मागे टाकले आहे.
इशान किशनच्या या झंझावातामुळे झारखंडने 50 षटकांत 9 बाद 412 धावांचा डोंगर उभा केला. इशानला विराट सिंग (88 धावा), कुमार कुशाग्र (63 धावा) आणि शिखर मोहन (44 धावा) यांनी मोलाची साथ दिली. कर्नाटकसमोर आता विजयासाठी 413 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून ही स्पर्धा यंदा मोठी विक्रमी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.