सध्या तिसऱ्या युद्धाचा भडका उडेल असं चित्र समोर आलं आहे. आज म्हणजेच 28 फेब्रुवारीला इराण आणि इस्रायल या देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आता याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. तसेच याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्य-पूर्वेत अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईनंतर आता गुंतवणूकदारांमध्ये भू-राजकीय तणाव आणि अनिश्चितता वाढण्याची भीती असेल. या परिस्थितीत सोमवारी व्यापार पुन्हा सुरू झाल्यावर विविध मालमत्ता, विशेषतः इक्विटी, सोने आणि चांदी, कच्चे तेलासह वेगवेगळ्या बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
या सर्व युद्धजन्य परिस्थितीमुळे, सोने आणि चांदीच्या बाजारातही अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचे पडसाद उमटू शकतात. एप्रिलमधील सोन्याचा वायदा भाव एमसीएक्सवर 2262 रुपयांनी वाढून 1,61,971 रुपयांवर स्थिरावला तर, मे चांदीचे फ्युचर्स 10,037 रुपये वाढून 2,81,990 रुपयांवर उसळले.
त्याचप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यात सोनाच्या वायदा दरात 8.32% किंवा 12,451 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली. त्याचवेळी, एमसीएक्सवरील चांदीचा दर फेब्रुवारीमध्ये जवळपास 3% किंवा 9,300 रुपयांनी घसरला.