IPS Officer Wife Death: निवृत्त IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला गळा दाबून संपवलं; सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास, विशेष पथके आरोपीच्या मागावर

घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी झाली असून, यामागे घरगुती मदतनीसांचा हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

IPS Officer Wife Death: निवृत्त IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला गळा दाबून संपवलं; सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास, विशेष पथके आरोपीच्या मागावर

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रशांत नगर येथील अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा तातडीने तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. 1986 च्या बॅचचे निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी विनय रंजन यांच्या पत्नीची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. त्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या.

क्रूरतेचा कळस आणि लूटमार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री एक वाजून 25 मिनिटांच्या सुमारास घडली. जेव्हा घरातील इतर सदस्य गाढ झोपेत होते, तेव्हा आरोपींनी या संधीचा फायदा घेतला. हल्लेखोरांनी विनय रंजन यांच्या पत्नीवर हल्ला चढवून अत्यंत क्रूरपणे त्यांची गळा मरोडून हत्या केली. हत्येचा हा रक्तरंजित खेळ खेळल्यानंतर आरोपींनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे मौल्यवान दागिने आणि मोठी रोकड घेऊन पोबारा केला. सुरुवातीच्या तपासात ही केवळ हत्या नसून लुटीच्या उद्देशाने केलेला एक सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे.

विश्वासू घरगड्यांचाच घात?

या भीषण गुन्ह्यामागे घरात कामाला असलेल्या नेपाळी नोकरांचा हात असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे नोकर गेल्या काही दिवसांपासून या घरात कार्यरत होते. त्यांनीच विश्वासाचा फायदा घेत घरातील सर्व हालचालींची माहिती मिळवली आणि मध्यरात्री हा घात केला. गुन्ह्याची पद्धत पाहता, आरोपींना घरातील मौल्यवान वस्तू कोठे ठेवल्या आहेत याची पूर्ण कल्पना होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. 'कुंपणानेच शेत खाल्ल्याचा' हा प्रकार असल्याने परिसरात संतापाची लाट आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना एकदम 4500 रुपये मिळणार'; आठच दिवसात सरकार तातडीने घेणार 'हा' निर्णय, वाचा सविस्तर

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबावरच हा आघात झाल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत राज्याच्या गृहसचिव शिखा गोयल आणि इंटेलिजन्स प्रमुख विजय कुमार यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवण्याचे आदेश दिले असून हाय-प्रोफाईल परिसरातील या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

विशेष पथकांकडून आरोपींचा शोध

या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 4 विशेष पथके तैनात केली असून, ही पथके वेगवेगळ्या दिशांना तपास करत आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज खंगाळले जात असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा दावा केला आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ज्या भागात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असते आणि जिथे चोवीस तास सुरक्षा तैनात असते, तिथेच अशा प्रकारची धाडसी चोरी आणि हत्या झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरगुती कामासाठी नोकर ठेवताना त्यांची पोलीस पडताळणी (Verification) करणे किती अनिवार्य आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हैदराबाद पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

हेही वाचा: Palghar: आईचं रागावणं मनाला लागलं अन् तरुणाने गाठलं मोरवणे धरण; पालघरमधील घटनेने परिसर हादरला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number