भारताचे सरंक्षणदलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंततर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक पार पडली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबईचा दौरा रद्द करत नवी दिल्लीत परतले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीच्या या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते तर संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही नव्या सीडीएसच्या नेमणुकीबाबत आपले मत नोंदवले आहे.
तामिळनाडू येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्य़े लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि अधिकारी असे १४ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे. त्यामुळे आता सीडीएस जागी कोणाची नेमणूक होईल यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत उच्चस्तरिय बैठक घेतली.