Gold Rate Today: लग्नसराईच्या हंगामात सोनं-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा चढ-उतार सुरू झाले आहेत. मागील दोन दिवस सलग कमी होत असलेल्या दरांनी ग्राहकांना थोडा दिलासा दिला होता. खरेदीसाठी योग्य वेळ शोधणाऱ्यांना त्याचा फायदा मिळत असतानाच, आज मात्र सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंनी मोठी उडी घेत बाजाराचे चित्रच बदलून टाकले आहे.
आज सकाळपासून सराफा बाजारात चढत्या किमती दिसू लागल्या. चांदीचा दर तर अक्षरशः उसळी मारत हजार रुपयांहून अधिक वाढीसह पुढे सरकला आहे. सोन्यानेही मागील दिवसांच्या घसरणीची भरपाई करत पुन्हा वाढीचा कल कायम ठेवला. यामुळे सण-उत्सव आणि लग्नांच्या खरेदीसाठी बाजारात उतरलेल्या ग्राहकांचे बरेचसे गणित बिघडले आहे.
फेडरल रिझर्व्हच्या संकेतांचा बाजारावर परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा भारतातील मौल्यवान धातूंच्या किमतींवर थेट परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमधील अधिकाऱ्यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा कल ‘सेफ हेवन’ म्हणजेच सोन्याकडे झुकला आहे. अमेरिकन कामगार बाजारपेठेत दिसणारी मंदी आणि डिसेंबरमध्ये संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्याला पाठबळ मिळाले.
व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर सोनं आणि चांदी यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक माध्यमांमध्ये मागणी झपाट्याने वाढते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वधारतात आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारातही दिसून येतो.
वायदे बाजारात मोठा उछाल
एमसीएक्सवरील सोन्याचा डिसेंबर वायदा आज पुन्हा वाढीस लागला आहे. सोन्याच्या वायद्यात सुमारे 557 रुपये ची वाढ नोंदली गेली असून नवीन किंमत 1,25,819 रुपये पर्यंत पोहोचली आहे. चांदीचा वायदा अधिक वेगाने धावला आणि तब्बल 1542 ने वाढून 1,57,908 रुपये झाला.
ही आकडेवारी पाहता बाजारातील तेजी येत्या काही दिवसांत आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सराफा बाजारातील आजचे दर
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरांतही वाढ कायम आहे.
22 कॅरेट सोनं (10 ग्रॅम) 1,16,460 रुपये
24 कॅरेट सोनं (10 ग्रॅम) 1,27,050 रुपये
चांदी (1 किलो) 1,67,100 रुपये
सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये या नव्या वाढीमुळे लग्नासाठी खरेदी करणाऱ्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. आधीच वाढलेल्या खर्चावर या दरवाढीमुळे अधिक भार पडणार आहे. अनेक सराफांचा अंदाज आहे की लग्नाचा हंगाम सुरु असल्याने मागणी वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून दर पुढील काही दिवस आणखी वाढू शकतात.
ग्राहकांच बजेट ढासळणार?
किंमतींच्या सततच्या चढ-उतारांमुळे सर्वसामान्य ग्राहक गोंधळून गेले आहेत. दोन दिवस मिळालेल्या सुटकेनंतर आजच्या झपाट्याने वाढलेल्या दरांनी त्यांच्या खिशाला पुन्हा ताण येणार आहे. लग्न आणि सणांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात उतरले असले तरी अनेक जण दर स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.