Crime News: हत्येनंतर 3 दिवस कारवाई नाही; संतप्त कुटुंबीयांनी सायकलवरून मृतदेह नेला थेट पोलीस ठाण्यात, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

ओडिशातील बालासोरमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह सायकलवरून पोलीस ठाण्यात नेला.

Crime News: हत्येनंतर 3 दिवस कारवाई नाही; संतप्त कुटुंबीयांनी सायकलवरून मृतदेह नेला थेट पोलीस ठाण्यात, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

ओडिशा: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिसांकडून वेळेत कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका कुटुंबाने मृत महिलेचा मृतदेह सायकलवर ठेवून थेट पोलीस ठाण्यापर्यंत नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावरही या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

मृत महिलेचं नाव कमला सेठी असं असून त्या 39 वर्षांच्या होत्या. बालासोर जिल्ह्यातील हरिपूर गावात रविवारी दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. घराच्या सीमारेषेजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामावरून दोन्ही कुटुंबांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र हा वाद पुढे इतका वाढला की त्याचं रूप हिंसक हल्ल्यात बदललं.

पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, बांधकामाचं साहित्य शेजाऱ्यांच्या जागेत गेल्यामुळे भरत जेना आणि त्याच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर झालेल्या वादात फावडे आणि कुदळीसारख्या वस्तूंनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कमला सेठी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कटक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हत्या होऊन तीन दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट फिरत असल्याचा संताप व्यक्त करत कुटुंबीयांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी महिलेचा मृतदेह सायकलवर ठेवला आणि सुमारे 15 किलोमीटर अंतर पार करत खैरा पोलीस ठाण्याकडे मोर्चा काढला.

हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकही हादरले. रस्त्यावरून मृतदेह घेऊन जात असताना अनेकांनी व्हिडीओ काढले आणि काही वेळातच हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कुटुंबासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मात्र कुटुंबीयांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. आरोपींना तातडीने अटक करावी आणि योग्य न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी होती.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एका आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे ओडिशामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number