इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. आखाती देशांमधील या वाढत्या तणावामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे शांतता कराराची मुदत सुरु असताना, दोन्ही देश पुन्हा एकदा एकमेकांविरोधात पेटलेले पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इराणला दमकी देत म्हटलं होत की, संपूर्ण देश एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकतो आणि ती रात्र आजही असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी तिथल्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजेपर्यंत शांतता कराराची अंतिम मुदत दिली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही मुदत बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "इराण एका रात्रीत नष्ट होऊ शकतो आणि ती रात्र शक्यतो मंगळवारची संध्याकाळ असू शकते", असेही ते म्हणाले. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला न जुमानता इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे. जिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आज रात्रीचा इशारा दिला होता, तिथे इराणने देखील आता डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेकडे अवघे 20 तास शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांचे मुख्य सल्लागार महदी मोहम्मदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत अमेरिकेला धमकी दिली आहे.
यावेळी मोहम्मदी सोशल मीडियावरील एक्सवर ट्वीट करत म्हणाले की, "आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. इराणने हे युद्ध आधीच जिंकले आहे. आता आम्ही केवळ अशाच तहाचा किंवा अंताचा स्वीकार करू, ज्यामुळे इराणचे हित जोपासले जाईल आणि आखाती प्रदेशात एक नवीन सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित होईल. ट्रम्प यांच्याकडे आता केवळ 20 तासांचा अवधी शिल्लक आहे, ज्यामध्ये त्यांनी एकतर इराणसमोर शरणागती पत्करावी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा (Allies) नाश पाहण्यास तयार राहावे." इराणने शरणागती पत्करावी अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र आता इराणने देखील पेटती भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान ट्रम्प यांनी म्हटल्या प्रमाणे इराणने शरणागती नाही पत्करली तर अमेरिका यावर काय भूमिका घेणार तसेच अमेरिकेच्या भूमिकेवर इराण त्याला कसे प्रत्युत्तर देतो, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.