झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील गोविंदपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीचा मृतदेह तब्बल पाच दिवस घरातच पडून होता. अंत्यसंस्कारासाठी मदत मागूनही कोणी पुढे न आल्याने, तिच्याच भावाने घरातील बाथरूममध्ये मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत तरुणीचे नाव लिपिका कुमारी असून ती गोविंदपूरमधील वास्तू विहार येथील निवासी कॉलनीत राहत होती. लिपिका ही घटस्फोटित होती आणि काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. तिचे वडील संगीत कुमार हे शास्त्रज्ञ होते आणि 2023 मध्ये त्यांचे निधन झाले होते. 8 एप्रिल 2026 रोजी लिपिकाचा संशयास्पद परिस्थितीत घरातच मृत्यू झाला.
घरात उपस्थित असलेल्या तिच्या भावाने, प्रणव राजवर्धन याने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली होती. मात्र, कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी 12 एप्रिल रोजी बहिणीचा मृतदेह बाथरूममध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. त्याने कपडे, रजई आणि उशा एकत्र करून त्यांना आग लावली. यामुळे घरातून मोठ्या प्रमाणात धूर आणि दुर्गंधी बाहेर येऊ लागली.
या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरातील परिस्थिती पाहून पोलीसही चक्रावून गेले. त्यांनी तत्काळ आग विझवून जळालेल्या मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. मात्र, या तणावामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी भावाची चौकशी सुरू केली असून शेजाऱ्यांकडूनही माहिती गोळा केली जात आहे.
या प्रकरणाचा आत्महत्या आणि खून या दोन्ही शक्यतांमधून तपास सुरू आहे. पोलिसांनी भाऊ-बहिणीच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू केली असून नातेवाईकांशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.