दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 20 दिवसांच्या मुलाला 8 लाख रुपयांना विकत घेतल्याप्रकरणी पती आणि सुनेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणादरम्यान गेल्या दोन वर्षांत सुमारे 30 बाळांची विक्री करणाऱ्या बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यासंबंधी 13 जणांना अटक केली असून आतापर्यंत सहा बालकांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपूर येथील हिरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत बाल तस्करी रॅकेट चालवले जात होते. रोहिणीच्या सेक्टर 3 मधील एका घरातून बाळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी गरिमा जैन आणि तिचे सासरे सतीश जैन यांना अटक केली आहे. सतीश जैन यांचा रोहिणीमध्ये स्टील उपकरणांचा कारखाना आहे. गरिमाचा पती अद्याप फरार आहे. त्या बाळाला एका बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आले आहे.
तपासकर्त्यांनी सांगितले की, हे कुटुंब कथितरित्या एका मध्यस्थामार्फत डॉ. विवेकी यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मुलासाठी 8 लाख रुपये दिले. यात हॉस्पिटलचे मालक डॉ. विवेकी (47), फ्रीलान्स लॅब टेक्निशियन प्रतिभा (34) आणि या रॅकेटचा सूत्रधार सायबाभाई घमर उर्फ कालिया (25) यांचा समावेश आहे. कालिया हा राजस्थानच्या उदयपूरचा रहिवासी असून तो गुजरातमध्ये राहत होता. दरम्यान सुटका केलेल्या बाळाच्या जैविक पालकांचा शोध घेण्याचे आणि या टोळीने विकल्याचा आरोप असलेल्या इतर बाळांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर असं समोर आलं की, राजस्थान आणि गुजरातमधील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना लक्ष्य करून त्यांना नवजात बाळासाठी 1.5 लाख ते 2 लाख रुपये देत. एवढचं नव्हे तर दिल्ली-एनसीआर, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील निःसंतान जोडप्यांना 6 लाख ते 9 लाख रुपयांना विकत असत. पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून दिल्लीस्थित रुग्णालयाचा मालक, एक लॅब टेक्निशियन, तस्कर, मध्यस्थ, वाहतूकदार आणि कथित खरेदीदार यांच्यासह 13 जणांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी ही ताजी अटकसत्रं झाली आहेत. आतापर्यंत सहा बालकांची सुटका करण्यात आली आहे.