सिया प्रकरण चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा येथे एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातीलच बाथरूममध्ये पुरला. तिने त्या जागेवर फरशी बसवून घेतली आणि त्याच बाथरूममध्ये ती रोज आंघोळ करत राहिली. या प्रकाराने पोलिसांसह सगळेच चक्रावले.
आग्र्यातील सिंकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्राची टॉवर चौकी परिसरातील रेणुका धाम कॉलोनीतील ही धक्कादायक घटना घडली. सुरेंद्र कुमार शर्मा हा 44 वर्षाचा इसम 18 मेपासून बेपत्ता होता. याबद्दल पोलिस स्थानकात त्याच्या नातेवाईकांसह पत्नीने तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पत्नीने पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि रडण्याचे नाटकही केले, परंतु तिच्या वागण्यामुळे तिच्या दिराच्या मनात संशय निर्माण झाला.45 दिवस तिने पोलीस आणि कुटुंबीय दोघांचीही दिशाभूल केली.
सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मानेही पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी सुरेंद्रच्या घराचा तपास करण्याचा निर्णय घेतला.तपास करत असताना पोलिसांची नजर बाथरूममधील लादीकडे गेली. बाथरूममध्ये ताजं प्लास्टर केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम सुरू केलं. बाथरूम खोदल्यावर लादीच्या खाली सुरेंद्रची डेडबॉडी सापडली.
अधिक चौकशी केल्यानंतर त्या महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती मद्यपान केल्यानंतर तिला मारहाण करायचा. त्यामुळे तिने खीरमध्ये 18 हून अधिक झोपेच्या गोळ्या मिसळून त्याला खाऊ घातल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिने राजस्थानमधील आपल्या मेहुण्याला बोलावले आणि आपली दोन मुले व सासू यांना घराबाहेर पाठवून दिले. त्यानंतर तिने तो मृतदेह खोलीतून बाथरूममध्ये ओढत नेला, तिथे खड्डा खणला आणि तो पुरून टाकला. त्यानंतर, तिने आपल्या मेहुण्याला सांगितले की, एका वादांनंतर तिचा पती 5000 रुपये घेऊन निघून गेला आहे. त्यानंतर ती स्वतः राजस्थानला गेली. आठ दिवसांनी परत आल्यावर, तिने बाथरूमच्या जमिनीचे काम करण्यासाठी मजुरांना बोलावले. सुरेंद्र शर्मा हे मूळचे राजस्थानमधील भरतपूरचे होते. ते आपली पत्नी, मुले आणि आई यांच्यासोबत आग्र्यात राहत होते.