काँग्रेस पक्षाला मोठा धक्का लागला आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मुलाने भाजपात प्रवेश केला आहे.
अवघ्या काही दिवसांवर दिल्लीत विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का समजला जात आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते जनार्दन द्विवेदी यांचा पुत्र समीर द्विवेदी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
पुत्राच्या भाजप प्रवेशाबाबत मला कल्पना नसल्याची प्रतिक्रिया जनार्दन द्विवेदी यांनी दिली आहे. भाजप प्रवेश करणं हा समीर द्विवेदीचा वैयक्तिक निर्णय असल्याचं जनार्दन द्विवेदी म्हणाले.
जनार्दन द्विवेदी कांग्रेसचे दिग्गज नेते आहेत. सोनिया गांधींचे ते निकटवर्तीय मानले जातात. जनार्दन द्विवेदी 2018 सालापर्यंत राज्यसभेचे खासदार होते. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं आहे.
याआधी अशाच प्रकारे महाबल मिश्रा यांच्या पुत्राने काँग्रेसचा ‘हात’ सोडला होता. माजी खासदार महाबल मिश्रांचे पुत्र विनय मिश्रा यांनी जानेवारीत आप पक्षात प्रवेश केला होता.
विनय मिश्रा यांनी २०१३ साली काँग्रेसच्या तिकीटावर पालम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दरम्यान त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.