पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच कोलकात्यातील न्यू टाऊन परिसर रक्ताने माखला आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार पीयूष कनोडिया यांच्या भावाची अज्ञात हल्खोरांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे भाजप ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच, आमदाराच्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात दहशतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदारकीच्या 4 तासांतच भावाचा विरह
नवनिर्वाचित आमदार पीयूष कनोडिया यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “मला आमदार होऊन अजून चार तास देखील पूर्ण झाले नव्हते, तोच मला माझ्या जवळच्या व्यक्तीचा आणि सहकाऱ्याचा मृतदेह पाहावा लागला,” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. विजयाची प्रमाणपत्रे हातात असतानाच कुटुंबातील सदस्याचा अशा प्रकारे अंत होणे, हे लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याचे कनोडिया यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे न्यू टाऊन परिसरात सध्या प्रचंड तणाव असून सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांना कडक कारवाईचे आदेश
या निर्घृण हत्येनंतर पीयूष कनोडिया यांनी पोलीस प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले आहे. “या हत्येमागे जे कोणी मास्टरमाईंड आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. कायद्याचा धाक निर्माण होईल अशी कारवाई करा,” असे निर्देश त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विविध कोनातून तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
“प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब घेणार”
भावाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या कनोडिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “प्रत्येक मृत्यूचा हिशोब घेतला जाईल आणि आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर भाजपच्या गोटातून राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
राजकीय हिंसेचे सावट
भारतीय जनता पक्षाने या घटनेला स्पष्टपणे ‘राजकीय हिंसाचार’ ठरवले आहे. बंगालमधील निवडणुकीनंतरची हिंसा ही चिंतेची बाब बनली असून, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हत्येमुळे राज्यातील आगामी राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून आरोपींचा माग काढत आहेत. हा पूर्वनियोजित कट होता की तात्कालिक वादातून झालेली हत्या, याचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, या एका घटनेने पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेच्या उत्साहावर विरजण पाडले असून, शांतता राखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.