Samastipur Minor Girl Molestation: बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जमुई येथील छेडछाडीची घटना ताजी असतानाच आता समस्तीपूर जिल्ह्यातून दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. समस्तीपूरच्या कर्पूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतसिंहपूर परिसरात 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. बाईकवरून आलेल्या एका अल्पवयीन मुलगा आणि मुलीला एका पूलावर 4 जणांच्या टोळक्याने अचानक घेराव घातला. आरोपींनी आधी त्या दोघांना जबर मारहाण केली, ज्यानंतर घाबरलेला मुलगा तेथून पळून गेला.
मुलीची सातत्याने छेडछाड आणि शिवीगाळ; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
मुलगा निघून गेल्यानंतर नराधमांनी एकट्या सापडलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. ती मुलगी सातत्याने विरोध करत होती, मात्र तरुणांनी तिचे काहीही न ऐकता तिला सातत्याने तिचा पत्ता विचारून शिवीगाळ केली. ‘सोबत आलेला मुलगा माझा भाऊ होता,’ असे मुलीने विनवणीपूर्वक सांगितल्यानंतरही या तरुणांनी तिला त्रास देणे सुरूच ठेवले. एका प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, ज्यानंतर नागरिकांमधून आणि नेटिझन्सकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – Crime : मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर; गावकऱ्यांनी कुटुंबासोबतच…; अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार
कर्पूरी पोलिसांकडून तात्काळ कारवाई; 4 जणांना केली अटक
हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर समस्तीपूर पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील मुख्य आरोपी राहुल कुमार पासवान (वय 19), त्याचे वडील अरुण पासवान, अवधेश पासवान, नेवालाल पासवान आणि विकास शर्मा या आरोपींना ताब्यात घेतले. संबंधित पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात विविध गंभीर कलमांखाली रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.
दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन; बिहारमधील गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह
काही दिवसांपूर्वीच जमुईमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती आणि आता लगेचच समस्तीपूरची ही घटना समोर आल्याने महिला व मुलींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेतील कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन पोलिसांनी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून या घटनेमुळे संपूर्ण बिहारमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे.