Bigg Boss Marathi 06: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय रिऍलिटी शो असलेल्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 11 जानेवारीपासून हा बहुचर्चित शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याआधीच संभाव्य स्पर्धकांच्या नावांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठी 6 मध्ये कोण-कोणते चेहरे घरात जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याच चर्चांदरम्यान आता इंडस्ट्रीमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी, बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 च्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मनोरंजनविषयक वेबसाईट्स आणि सूत्रांनी याबाबत दावा केला असून, यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्रेयस तळपदे हा मराठी इंडस्ट्रीसाठी केवळ अभिनेता नसून एक ब्रँड मानला जातो. मराठीतून सुरुवात करून त्याने हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. कॉमेडी, कौटुंबिक भूमिका, गंभीर अभिनय तसेच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत श्रेयसने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच साऊथ चित्रपटसृष्टीतही त्याने दमदार एन्ट्री घेतली असून, त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
बिग बॉससारख्या गेम शोसाठी श्रेयस तळपदे हा परफेक्ट स्पर्धक ठरू शकतो, असं अनेकांचं मत आहे. शांत स्वभाव, समजूतदार बोलणं आणि प्रसंगानुरूप योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याला घरात वेगळं स्थान मिळवून देऊ शकते. घरातील गटबाजी, रणनीती आणि वादग्रस्त परिस्थिती तो कशी हाताळतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.
यंदाच्या सीझनचा आणखी एक खास भाग म्हणजे अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी 6 चा होस्ट आहे. रितेश आणि श्रेयस यांची मैत्री सर्वश्रुत असून, दोघांनीही अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. अशातच एक मित्र होस्टच्या भूमिकेत आणि दुसरा मित्र स्पर्धक म्हणून घरात दिसल्यास शोला वेगळीच रंगत येण्याची शक्यता आहे.
मात्र, या चर्चांवर अद्याप श्रेयस तळपदे किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो खरोखरच बिग बॉस मराठी 6 मध्ये दिसणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. तरीही, ही एन्ट्री झालीच तर बिग बॉस मराठीच्या इतिहासातील ती एक मोठी आणि लक्षवेधी एन्ट्री ठरेल, यात शंका नाही.