Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांवर बीड कारागृह प्रशासनाचा खुलासा; ‘सर्व सुविधा…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपांनंतर बीड कारागृह प्रशासनाने खुलासा केला आहे.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांवर बीड कारागृह प्रशासनाचा खुलासा; ‘सर्व सुविधा…

बीड: बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना कथित व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपांनंतर कारागृह प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना नियमबाह्य सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राज्यभर या प्रकरणाची चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून कारागृहातील प्रत्येक सुविधा शासनाच्या नियमांनुसारच दिली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कारागृह प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, कोणत्याही कैद्याला विशेष किंवा नियमबाह्य सुविधा देण्यात येत नाहीत. कारागृह नियमावलीनुसार सर्व कैद्यांना समान सुविधा दिल्या जातात. आठवड्यातून तीन ऑडिओ कॉल आणि दोन व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी शासनाच्या नियमानुसार उपलब्ध आहे. तसेच, कारागृहातील अधिकृत कॅन्टीनमधून महिन्याला ठरावीक मर्यादेपर्यंत खाद्यपदार्थ खरेदी करण्याची सुविधा आहे. ही मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली असून ती सर्व पात्र कैद्यांसाठी समान स्वरूपात लागू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा: Vikroli Crime News : मुंबई हादरली! पहाटे 2 वाजता मोठ्याने गाणी लावण्याच्या वादातून कुटुंबात राडा; धारदार चाकूहल्ल्यात दोघांचा मृत्यू

याशिवाय, बाहेरून जेवण किंवा इतर कोणतीही अनधिकृत सुविधा कोणत्याही कैद्याला दिली जात नसल्याचा दावाही कारागृह प्रशासनाने केला आहे. कारागृहातील सर्व व्यवहार नियमानुसार होत असून त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियमित निरीक्षण असते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही विविध स्तरांवरून कारागृहाची अनेकदा तपासणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी केली होती. मात्र, अशा तपासण्यांमध्ये नियमबाह्य सुविधा दिल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, कारागृह प्रशासनाने वारंवार बीड जिल्हा कारागृहाबाबत अशा प्रकारचे आरोप करून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त केली आहे. कोणतेही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासून पाहावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: Tarun Tejpal : 'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल लैंगिक अत्याचारप्रकरणात दोषी; न्यायालयाचा निकाल

या प्रकरणाची चर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कथित विशेष वागणूक मिळत असल्याच्या आरोपांनंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकृत खुलासा करत सर्व सुविधा शासनाच्या नियमांनुसारच दिल्या जात असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते आणि संबंधित आरोपांवर पुढील घडामोडी काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number