Fertilizer License Cancelled: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट टाळण्यासाठी आणि खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पुणे जिल्हा कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. युरिया खताच्या साठ्यात अफरातफर करणाऱ्या आणि पॉस (PoS) यंत्रणेत नोंदी न ठेवणाऱ्या जिल्ह्यातील 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य काम करणाऱ्या खत विक्रेत्यांच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.
3500 टन युरियाचा हिशोब मिळेना
कृषी विभागाने 1 एप्रिलपासून राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक विक्रेत्यांच्या गोदामात खताचा प्रत्यक्ष साठा होता, मात्र त्याची डिजिटल नोंद 'पॉस' मशीनवर करण्यात आली नव्हती. तपासणी दरम्यान तब्बल 3500 टन युरियाचा साठा दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे. हा साठा कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी होता का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
तालुकानिहाय कारवाईचा बडगा
पुणे जिल्हा कृषी विभागाने विविध तालुक्यांतील एकूण 15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक केंद्रांचा समावेश असून, लिंगाळी येथील आदिती कृषी सेवा केंद्र, देऊळगाव राजे येथील बळीराजा ॲग्रो एजन्सी, पिंपळगावची शिव कृपा ॲग्रो एजन्सी, नंदादेवी येथील नंदाई ॲग्रो सर्विसेस, बिरोबा वाडीचे बिरोबा कृषी सेवा केंद्र, हिंगणी बेर्डे येथील श्रीराम कृषी भंडार आणि श्रीनाथ ॲग्रो सर्विसेस या केंद्रांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील आगोती नंबर 1 येथील महेश फर्टिलायझर आणि कळस येथील गणेश ॲग्रो एजन्सी या दोन केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथील विघ्नहर कृषी, जुन्नरमधील कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी आणि बेल्हे येथील पाटील कृषी सेवा केंद्र या तीन केंद्रांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. याव्यतिरिक्त शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील शेतकरी राजा कृषी उद्योग आणि भोर तालुक्यातील वेळ येथील श्री भैरवनाथ शेती भांडार या केंद्रांचाही समावेश आहे.
शेतकऱ्यांनो सावध राहा
ज्या विक्रेत्यांचे परवाने रद्द झाले आहेत, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खत खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खत खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
केवळ अधिकृत केंद्रांवरूनच खतांची खरेदी करा.
प्रत्येक खरेदीचे पक्के बिल (पावती) आवर्जून घ्या.
आपला व्यवहार पॉस मशीनवर नोंदवला गेल्याची खात्री करा.
प्रशासनाचा कडक इशारा
वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. "खतांचा काळाबाजार किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा जिल्हा कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.