Aditi Sharma: लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सुरू झाला छळ? अभिनेत्रीचा पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा यांनी पती, सासू आणि नणंदाविरोधात कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि स्त्रीधनाच्या गैरवापराचे आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आह

Aditi Sharma: लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सुरू झाला छळ? अभिनेत्रीचा पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

मुंबई : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा यांनी पती, सासू आणि नणंदाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. गोरेगाव पोलिसांनी 31 जुलै रोजी या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, अदिती यांनी पती अभिनीत विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, मारहाण, शिवीगाळ, चारित्र्यावर संशय घेणे आणि लग्नातील दागिन्यांचा गैरवापर केल्याचे आरोप केले आहेत.

अदिती यांच्या माहितीनुसार, 2021 मध्ये ऑनलाइन अभिनय वर्गादरम्यान त्यांची आणि अभिनीत यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी विवाह केला. त्याआधी काही महिन्यांपासून दोघे गोरेगाव येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच पतीच्या वागण्यात मोठा बदल झाला. कपड्यांवरून आक्षेप घेणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद घालणे आणि घरखर्चासाठी स्वतः मदत न करता तिच्याकडून पैसे घेणे, असे प्रकार सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, जानेवारी 2025 मध्ये कॉफीवरून झालेल्या वादानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेत विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्याचेही अदिती यांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्याने वारंवार मोबाईल तपासणे, वेगळ्या खोलीत राहणे आणि आई-वडिलांशी संपर्क ठेवण्यास विरोध केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अदिती यांनी सासूवर लग्नातील सोन्याचे दागिने स्वतःकडे ठेवून ते परत न दिल्याचा आरोप केला आहे. तसेच, वाद मिटवण्यासाठी घरी आलेल्या सासू आणि नणंद यांनीही पतीची बाजू घेत आपला मानसिक छळ केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या सर्व आरोपांच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप आरोपींकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तपासानंतरच संपूर्ण प्रकरणाचे वास्तव स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number