Amravati Crime: राज्यातील खळबळजनक ठरलेल्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून, आतापर्यंत मुख्य आरोपी अयान अहमदसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
तपासात धक्कादायक खुलासे
पोलिसांनी आरोपींकडून 5 मोबाईल फोन जप्त केले असून, फॉरेन्सिक तपासणीत अत्यंत संतापजनक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 आक्षेपार्ह फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुख्य आरोपी अयान याने तब्बल 8 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. यातील 2 तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून तर 6 जणींचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते.
पोलीस प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’; 7 कर्मचाऱ्यांवर कारवाई
या संवेदनशील प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, यासाठी अमरावती पोलीस अधीक्षकांनी कडक पावले उचलली आहेत. तपासात हलगर्जीपणा किंवा प्रभाव पडू नये या उद्देशाने एक सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि 6 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे, जेणेकरून तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये.
हेही वाचा – Crime News : महिलेवर विमान प्रवासात अत्याचार, भारतीय नागरिकाला अटक; ऑस्ट्रेलियात गुन्हा दाखल
मोठ्या रॅकेटचा संशय आणि पुढील तपास
आरोपींनी हे व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले की यामागे एखादे मोठे गुन्हेगारी रॅकेट सक्रिय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, जप्त केलेले सर्व मोबाईल अधिक सखोल तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणातील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आगामी काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.