मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शीव उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी दोन वर्षांकरिता बंद करण्यात आला आहे. पूल बंद केला असल्यामुळे मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. तसेच बेस्ट प्रशासनाने २०२ बसच्या मार्गात बदल केला आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा शीव उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल आयआयटीने संरचनात्मक तपासणी करून दिला आहे. यानंतर शीव उड्डाणपूल तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुना पूल तोडून नवीन पूल उभारणीसाठी मध्य रेल्वेबरोबरच मुंबई महापालिकेकडूनही निधी उपलब्ध केला जाणार आहे.
माटुंगा विभागात बी. ए. रोडवरून शीव उड्डाणपूल पश्चिम वाहिनीमार्गे एल. बी. एस रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, त्याचप्रमाणे कुर्ला वाहतूक विभागात एल. बी. एस रोड, तसेच संत रोहिदास रोडवरून शीव उड्डाणपूल पूर्व वाहिनीवरून बी. ए. रोडमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक ही वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे.