प्रवाशांकडून तिकिटाचे शुल्क वसूल करायचे पण सुविधांच्या नावाने बोंब असण्याचा अनुभव अनेकांना रेल्वे प्रवासाच्या दरम्यान आला असेलच. मात्र, एका रेल्वे प्रवाशाने असुविधेमुळे झालेल्या त्रासानंतर रेल्वे विरोधातच ग्राहक न्यायालयात तक्रार केली आहे. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने दक्षिण मध्य रेल्वेला दंड ठोठावला. गरीब रथ एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एसी, पंखे सुरू नव्हते. त्यामुळे खेळती हवा नसलेल्या डब्यातून प्रवास करावा लागला असल्याचे प्रवाशाने म्हटले.
मिळालेल्या वृत्तानुसार, दक्षिण मध्य रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवाशी केव्हीएस अप्पा राव यांनी तक्रार दाखल केली होती. गरीब रथ एक्स्प्रेसमधील एसी, पंखे सुरू नसल्याची तक्रार रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे राव यांनी सांगितले. त्याशिवाय, झालेल्या मनस्तापासाठी नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारे पत्र अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यावर जिल्हा ग्राहक न्यायालयाने हे प्रकरण बेजबाबदारपणा आणि सेवा पूर्णपणे न देण्याचे असल्याचे म्हटले. दक्षिण मध्य रेल्वेने बिघाडावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करत प्रवास करावा लागला. त्यामुळे रेल्वेला ग्राहक न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.