India-Afghanistan Trade : पाकिस्तानसाठी मोठा धक्का?; भारत-अफगाणिस्तानमध्ये 100 दशलक्ष डॉलर्सचा करार

तालिबानचे मंत्री अल्हाज नूरुद्दीन अजीजी यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक खोलवर नेण्यासाठी भारताचा एक विशेष दौरा केल्यानंतर काही दिवसांनी हा करार झाला आहे.

India-Afghanistan Trade : पाकिस्तानसाठी मोठा धक्का?; भारत-अफगाणिस्तानमध्ये 100 दशलक्ष डॉलर्सचा करार

India-Afghanistan Trade Relations : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आर्थिक सहकार्याच्या (Economic Cooperation) नव्या टप्प्याचे संकेत देणारी एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या व्यापार क्षेत्रातील रोफी'ज इंटरनॅशनल ग्रुप ऑफ कंपनीज (Rofi's International Group of Companies) आणि भारतातील झायडस लाईफ सायन्सेस (Zydus Lifesciences) या आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांनी दुबईत 100 दशलक्ष डॉलर्सच्या (100 million US Dollars) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार पाकिस्तानच्या (Pakistan) प्रादेशिक व्यापारातील प्रभावासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अफगाणिस्तानच्या मंत्र्यांच्या भारत भेटीचे फलित
हा करार अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अल्हज नूरुद्दीन अझीझी यांनी भारताचा उच्चस्तरीय दौरा आटोपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच झाला आहे. या भेटीदरम्यान त्यांनी नवी दिल्लीसोबत सखोल व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अफगाण दूतावास, दुबई येथे अफगाण राजदूत आणि वाणिज्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अफगाणिस्तानच्या आरोग्य सेवा क्षेत्रात भारताचा ठसा वाढवण्यासह अफगाणिस्तानची औषध उत्पादन क्षमता पुन्हा उभारण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

स्थानिक उत्पादनावर लक्ष केंद्रित
अफगाणिस्तानच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताच्या प्रमुख औषध उत्पादकांपैकी एक असलेली झायडस लाईफ सायन्सेस सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये औषधे निर्यात करेल. कालांतराने, ही कंपनी आपले प्रतिनिधी कार्यालय अफगाणिस्तानमध्ये हलवेल आणि देशांतर्गत औषध उत्पादनाला सुरुवात करेल. स्थानिक उत्पादनासाठी तांत्रिक डेटा आणि माहिती (Technical Know-how) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Nepal Currency: नेपाळच्या नव्या 100 रुपयांच्या नोटेवर वादग्रस्त नकाशा; भारताने घेतला आक्षेप

आरोग्य सेवा सुधारण्यासाठी 'परिवर्तनकारी पाऊल'
अफगाण दूतावासाने या कराराचे वर्णन आरोग्य सेवा मानके सुधारण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाच्या आयात केलेल्या औषधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक 'परिवर्तनकारी पाऊल' (Transformative Move) म्हणून केले आहे. अफगाण व्यापाऱ्यांनी या कराराचे खुलेआम समर्थन केले असून, भविष्यातील अशा धोरणात्मक भागीदारीसाठी हा एक आदर्श नमुना असल्याचे म्हटले आहे. या करारामुळे अफगाण फार्मास्युटिकल (Pharmaceutical) सुविधांची तांत्रिक क्षमता लक्षणीयरीत्या सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानसाठी हा मोठा 'सेटबॅक'
या कराराचे महत्त्वपूर्ण भौगोलिक-राजकीय महत्त्व आहे. तालिबानने नुकतीच पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला असून, अफगाण कंपन्यांना तीन महिन्यांच्या आत पाकिस्तानी पुरवठादारांसोबतचे औषध व्यवसाय संबंध संपवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा नवीन भारत-अफगाणिस्तान करार पाकिस्तानसाठी थेट 'सेटबॅक' (Setback for Pakistan) मानला जात आहे, कारण पाकिस्तान पारंपारिकपणे अफगाण व्यापारासाठी एक प्रमुख वाहतूक आणि व्यापार केंद्र म्हणून काम करत होता. मंत्री अझीझी यांनी आपल्या पहिल्या भारत भेटीदरम्यान, काबूलमध्ये भारतीय कंपन्या आणि मुत्सद्दींना पूर्ण सुरक्षा हमी देण्याचे आश्वासन दिले होते. 100 दशलक्ष डॉलरचा हा सामंजस्य करार नवी दिल्लीसोबत धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याची आणि पाकिस्तानी व्यापार मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्याची काबूलच्या सरकारची इच्छा असल्याचेही यातून दर्शवत आहे.

हेही वाचा – Hong Kong Fire Tragedy: मानवनिर्मित आपत्ती? हॉंगकॉंग आगीत 94 मृत, रहिवाशांचे गंभीर आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number