Strait of Hormuz: पश्चिम आशियातील युद्धाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून बंद असलेल्या मोक्याच्या 'होर्मुझ सामुद्रधुनी'बाबत (Strait of Hormuz) इराणने आपली भूमिका मवाळ केली असून, व्यापारी जहाजांसाठी हा मार्ग अंशतः खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जगाचा श्वास कोंडणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' का महत्त्वाची?
जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा समुद्री मार्ग अत्यंत कळीचा मानला जातो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे 20 टक्के व्यापार याच मार्गावरून होतो. भारत आपल्या गरजेच्या 40 ते 50 टक्के कच्चे तेल याच मार्गाने आयात करतो. हा मार्ग बंद झाल्याने भारतात इंधन टंचाईचे संकट उभे राहिले होते. जगातील दर 5 पैकी 1 व्यापारी जहाज याच सामुद्रधुनीतून प्रवास करते. त्यामुळे हा मार्ग बंद होणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची गती थांबण्यासारखे होते.
इराणचा 'तो' मोठा निर्णय काय?
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या वाढत्या तणावामुळे इराणने या मार्गावर लष्करी तैनात करून नाकेबंदी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करण्याचा इशारा देऊनही इराण मागे हटत नव्हता. मात्र, आता इराणने एक पाऊल मागे घेत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे.
परंतु, यासाठी इराणने काही अटी घातल्या आहेत:
1. प्रत्येक जहाजाला प्रवासापूर्वी इराणची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असेल.
2. इराणने ठरवून दिलेल्या कडक नियमावलीचे पालन सर्व व्यापारी जहाजांना करावे लागेल.
3. केवळ जीवनावश्यक आणि तातडीच्या मालवाहतुकीलाच सध्या प्राधान्य दिले जाईल.
हेही वाचा – Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कंगाल होणार? UAE ने मागितलं 29 वर्षांपासून थकलेलं 3.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज
जागतिक स्तरावर स्वागत
इराणच्या या निर्णयामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यातील अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतासह चीन, पाकिस्तान आणि युरोपीय देशांवरील ऊर्जेचे संकट काही प्रमाणात हलके होणार असल्याने, आंतरराष्ट्रीय समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.