Vaibhav Suryavanshi: गेल्या काही काळापासून सातत्याने टीकेला सामोरे जावे लागणाऱ्या 'इंडिया ए'च्या वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाने अंतिम सामन्याच्या भव्य मंचावर सर्वांनाच थक्क करणारी कामगिरी केली आहे. 'श्रीलंका ए' विरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने एका स्फोटक खेळीसह 'लिस्ट-ए' (List-A) क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात 'श्रीलंका ए'ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय वैभवच्या झंझावातामुळे त्यांच्यावरच उलटला.
टीकाकारांना बॅटनेच दिले चोख प्रत्युत्तर
संपूर्ण मालिकेत धावा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि काही दिवसांपूर्वीच लंकेच्या एका खेळाडूशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या 15 वर्षीय वैभववर या मोठ्या सामन्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, दबावाचे रूपांतर संधीत करत डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मोहम्मद शिराजला चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत, त्याने अवघ्या 11 चेंडूंत डावातील आपला 5 वा षटकार खेचून 50 धावांचा टप्पा पार केला. या वादळी खेळीमुळे त्याने तब्बल 20 वर्षांपूर्वीचा म्हणजेच दोन दशकांपासून अबाधित असलेला जागतिक विक्रम मोडीत काढला.
शतकाची हुलकावणी पण ऐतिहासिक खेळी
या धडाकेबाज सुरुवातीमुळे 'इंडिया ए'ला मजबूत पाया मिळाला आणि सामन्याचे चित्र पालटले. अर्धशतकानंतर वैभव आपल्या पहिल्या शतकाकडे कूच करत होता, मात्र दुर्दैवाने शतकापासून अवघ्या 6 धावा दूर असताना तो बाद झाला. त्याने 29 चेंडूंचा सामना करत 94 धावांची खेळी उभारली, ज्यात 10 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
लिस्ट-A क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतके झळकावणारे फलंदाज:
11 चेंडू – वैभव सूर्यवंशी, भारत अ विरुद्ध श्रीलंका अ, दांबुला (2026)
12 चेंडू – कौशल्या वीरारत्ने, रागामा क्रिकेट क्लब विरुद्ध कुरुणेगाला युथ क्रिकेट क्लब, कोलंबो (2005/06)
13 चेंडू – थिसारा परेरा, श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ब्लूमफिल्ड, पनागोडा (2020/21)
14 चेंडू – रॉरी क्लेनवेल्ड, पश्चिम प्रांत विरुद्ध क्वाझुलु-नताल, डर्बन (2010/11)
हेही वाचा – IND vs AFG: यशस्वीचे शतक अन् प्रसिद्धचे 5 बळी; भारताचा अफगाणिस्तानवर 9 गडी राखून दणदणीत विजय
दोन्ही संघांचे अंतिम 'प्लेइंग इलेव्हन' (Playing XI):
भारत अ: प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, विपराज निगम, अशोक शर्मा, यश ठाकूर.
श्रीलंका अ: निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, सहान अरचिगे (कर्णधार), रविंदू फर्नांडो, वानुजा सहान, मोहम्मद शिराझ, विजयकांत व्यासकांत, दुलाज समुदीथा, इसिथा विजेसुंदरा.