Vaibhav Suryavanshi : भारताचा युवा आणि उगवता फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मैदानावर आपल्या बॅटची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. दुलीप ट्रॉफीच्या निमित्ताने त्याच्यासमोर एका नव्या आणि अत्यंत कठीण आव्हानाची भिंत उभी ठाकली आहे. 23 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेच्या माध्यमातून वैभव कसोटी (रेड बॉल) फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरेल. या फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप मोठा छाप पाडता आलेली नसली, तरी या महत्त्वाच्या मोसमात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'ईस्ट झोन' विरुद्ध 'नॉर्थ ईस्ट झोन' सामना
बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना 23 ऑगस्ट (रविवार) रोजी सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. बेंगळुरू येथे रंगणाऱ्या या सलामीच्या लढतीत 'ईस्ट झोन'चा सामना 'नॉर्थ ईस्ट झोन'शी होणार आहे. या सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'ईस्ट झोन'च्या कर्णधारपदी यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली असून, अवघ्या काही सामन्यांचा अनुभव असलेल्या वैभव सूर्यवंशीकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी दुसऱ्या सामन्यात 'नॉर्थ झोन' आणि 'वेस्ट झोन' हे संघ एकमेकांशी भिडतील.
हेही वाचा – Hockey World Cup 2026: मोठी बातमी भारताची पाकिस्तानवर 5-3 ने मात; हॉकी विश्वचषकात 'टॉप 8' मधील स्थान पक्कं
रेड बॉल क्रिकेटमध्ये वैभवच्या संयमाची कसोटी; 6 सप्टेंबरला रंगणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या वैभव सूर्यवंशीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 17.25 च्या सरासरीने 207 धावा केल्या असून, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे या दीर्घ फॉरमॅटमध्ये संयम, तंत्र आणि एकाग्रतेचा कस लागणार आहे. ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात करण्यासाठी तो मैदानात उतरतो की मधल्या फळीत फलंदाजी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम आणि खिताबी सामना 6 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याचे क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.