Rohit Sharma New Show Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी टीव्हीवर त्याचा ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ हा वीकेंड गेमिंग शो सुरू होत आहे. मात्र, हा शो प्रसारित होण्यापूर्वीच त्याच्या पहिल्या प्रोमोवरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. या प्रोमोमध्ये रोहितने सांगितलेल्या एका जुन्या किस्स्यावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील किस्सा ठरला वादाचे कारण
प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये रोहित शर्मा, माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि शोचा सूत्रसंचालक मनीष पॉल यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी रोहितने 2014-15 च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. तो गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथसोबत त्याची वादळी बाचाबाची झाली होती. त्या कठीण प्रसंगात शिखर धवनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर ठामपणे उभे राहून आपली साथ दिल्याचा दावा रोहितने या प्रोमोत केला आहे.
विराट कोहलीच्या चाहते रोहित शर्मावर तुटून पडले
रोहितचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रोहित ज्या घटनेचा उल्लेख करत आहे, ती प्रत्यक्षात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात घडली होती, असा दावा चाहत्यांनी केला. तसेच, आपला दावा सिद्ध करण्यासाठी चाहत्यांनी 2014-15 च्या मालिकेतील जुने व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून शेअर केले. रोहित शर्मा शोमध्ये खोटी आणि चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप काहींनी केला. या मुद्द्यावरून दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.
straight up lying on national television?? https://t.co/7KLIwiG6Jw — flick (@onlykohly) September 11, 2026
19 सप्टेंबरपासून शो होणार प्रसारित
या सर्व गदारोळानंतरही प्रेक्षकांमध्ये या शोबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा एक कौटुंबिक गेमिंग शो असून यामध्ये क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या शोचा पहिला भाग 19 September पासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्ह (SonyLIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे.
निर्मात्यांकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा
प्रोमोवरून निर्माण झालेल्या या वादावर रोहित शर्मा किंवा शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हा केवळ एक संक्षिप्त प्रोमो असल्याने रोहितने तो किस्सा कोणत्या संदर्भात सांगितला होता, हे संपूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.