PV Sindhu Returns to India: भारताची स्टार शटलर आणि दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू अखेर सुरक्षितपणे मायदेशी परतली आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये अडकलेली सिंधू आता बंगळुरू येथील आपल्या घरी पोहोचली असून, तिने स्वतः एक्स सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. “मी सुरक्षितपणे घरी परतली आहे. गेले काही दिवस खूप कठीण आणि अनिश्चिततेचे होते, पण आता घरी परतल्याचा आनंद आणि समाधान मोठे आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दुबई विमानतळ कर्मचाऱ्यांचे मानले आभार
संकटकाळात मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सिंधूने दुबई विमानतळ कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. तिने म्हटले की, “या कठीण काळात आमची इतकी चांगली काळजी घेणाऱ्या आणि मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. त्यांची सहानुभूती आणि व्यावसायिकता खरोखरच शब्दांच्या पलीकडे आहे.” सध्या आपल्याला विश्रांतीची आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा सज्ज होण्याची गरज असल्याचेही तिने नमूद केले.
ऑल इंग्लंड ओपनचे स्वप्न अधुरे
सिंधू 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंग्लंड ओपन’ स्पर्धेसाठी बर्मिंगहॅमला जात होती. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे उद्भवलेली युद्धसदृश परिस्थिती आणि युएईमधील हवाई क्षेत्र बंद झाल्याने ती 28 फेब्रुवारीपासून दुबईत अडकली होती. दुबई विमानतळाजवळील स्फोट आणि बिघडत्या परिस्थितीचे अपडेट्स ती सातत्याने देत होती. या अनपेक्षित संकटामुळे सिंधूला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून, तिचे ऑल इंग्लंड ओपनमध्ये खेळण्याचे स्वप्न यंदा भंगले आहे.
Back home in Bangalore and safe ? The last few days have been intense and uncertain, but I’m truly grateful to be back to my house. A heartfelt thank you to the incredible ground teams, Dubai authorities, airport staff, immigration, and every single person who stepped up and… — Pvsindhu (@Pvsindhu1) March 3, 2026
भारतीय आव्हानाचे नेतृत्व आता लक्ष्य सेनकडे
सिंधू स्पर्धेला मुकली असली तरी, भारताचे इतर काही खेळाडू पर्यायी मार्गांनी वेळेवर बर्मिंगहॅमला पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा स्टार शटलर लक्ष्य सेनवर असतील. लक्ष्यचा सामना पहिल्या फेरीत चीनच्या अव्वल खेळाडू शी युकीशी होणार आहे, तर युवा खेळाडू आयुष शेट्टी इंडोनेशियाच्या अल्वी फरहानशी भिडणार आहे. प्रवासाच्या थकव्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.