Powerlifter Sukhvir Singh:क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पंजाबमधील नवांशहर येथील रहिवासी, प्रसिद्ध पॉवरलिफ्टर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर सुखवीर सिंह याचा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेदरम्यान अचानक मृत्यू झाला. स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत विजेतेपद पटकावल्यानंतर काही मिनिटांतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.
लुधियाना शहरातील सलेम टाबरी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुखवीर सिंह सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने प्रथम 150 किलो वजनाची बेंच प्रेस यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर 350 किलो वजनाची अवजड डेडलिफ्ट उचलत त्याने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली. या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तो स्पर्धेचा विजेता ठरला.
मात्र, विजयाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. स्पर्धा संपल्यानंतर काही वेळातच सुखवीरच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला थकव्यामुळे असेल असे समजून त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मैदानातून बाहेर पडत तो आपल्या कारकडे गेला, मात्र कारमध्ये बसण्याआधीच तो अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला.हेही वाचा: Vijay Hazare
ही बाब लक्षात येताच सहकारी खेळाडू, आयोजक आणि उपस्थितांनी तातडीने त्याला लुधियाना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत ‘कार्डियक अरेस्ट’ हेच त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका तरुण, तंदुरुस्त आणि फिटनेसचा आदर्श मानल्या जाणाऱ्या खेळाडूचा असा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुखवीर सिंह हा केवळ पॉवरलिफ्टर नव्हता, तर तो अनेक तरुणांचा प्रेरणास्थान होता. सोशल मीडियावर ‘Sukh Fitness’ या नावाने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट असून त्याला 55 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. फिटनेस ट्रेनर म्हणून त्याची ओळख होती आणि बलाचौर येथे त्याचे स्वतःचे जिमही होते. तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवून व्यायाम आणि खेळाकडे वळवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता.
सुखवीरच्या निधनानंतर बलाचौर आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीय, मित्र, विद्यार्थी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने त्याच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. पारंपरिक धार्मिक विधींनुसार, लाल पगडी परिधान करून त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.
एका क्षणात शिखरावर पोहोचलेला खेळाडू पुढच्याच क्षणी काळाच्या पडद्याआड गेला. सुखवीर सिंहच्या अकाली जाण्याने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला असून, फिटनेस आणि स्पर्धात्मक खेळातील आरोग्य तपासण्यांबाबतही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.