Duleep Trophy 2026: इशान किशन दुखापतग्रस्त; 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सांभाळली ‘ईस्ट झोन’च्या कर्णधारपदाची धुरा

सामन्याच्या सुरुवातीला 'ईस्ट झोन'चा नियमित कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Duleep Trophy 2026: इशान किशन दुखापतग्रस्त; 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सांभाळली ‘ईस्ट झोन’च्या कर्णधारपदाची धुरा

Duleep Trophy 2026: दुलीप करंडक  2026 च्या (Duleep Trophy) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना सध्या 'ईस्ट झोन' आणि 'सेंट्रल झोन' या दोन ताकदवर संघांमध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला 'ईस्ट झोन'चा नियमित कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रात ईस्ट झोनला मोठा धक्का बसला. 19 व्या षटकादरम्यान यष्टीरक्षण करत असताना चेंडू थेट इशान किशनच्या उजव्या मनगटावर जोरात आदळला. तीव्र वेदनांमुळे फिजिओकडून मैदानावरच प्राथमिक उपचार घेण्यात आले, परंतु त्रास वाढल्याने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी मैदान सोडावे लागले. किशनच्या अनुपस्थितीत कुमार कुशाग्राने यष्टीरक्षणाची सूत्रे हाती घेतली, तर संघाचा उपकर्णधार असलेल्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मैदानात कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच वरिष्ठ संघाचे नेतृत्व करत रचला इतिहास

अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी प्रथमच वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व करत आहे. वैभवचा हा केवळ 2 रा दुलीप करंडक सामना असून एकूण 10 वा प्रथम श्रेणी (first-class) सामना आहे. त्याने 2024 च्या सुरुवातीला रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करून सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक ठरण्याचा विक्रम नोंदवला होता. 'नॉर्थ ईस्ट झोन' विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाजीत त्याने 8 चेंडूत 6 धावा केल्या होत्या, परंतु गोलंदाजीत 2 बळी (विकेट्स) मिळवून मोलाचे योगदान दिले होते. आता इतक्या लहान वयात दुलीप करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – The Great Khali Fortuner Crashes: हायवेवर ‘द ग्रेट खली’च्या फॉर्च्युनरचा चुराडा! भीषण अपघातानंतर दिलदीप सिंह राणा यांची प्रकृती चिंताजनक?

'ईस्ट झोन'च्या संघात महत्त्वाचा बदल; 'सेंट्रल झोन'ची संथ सुरुवात

या उपांत्य सामन्यासाठी 'ईस्ट झोन'ने आपल्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मागील सामन्याचा नायक ठरलेला अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी कुनैन कुरेशीला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या 'सेंट्रल झोन' संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली. पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत 'सेंट्रल झोन' संघाने 3 गडी गमावून 81 धावा केल्या आहेत. आता इशान किशन कधी बरा होऊन मैदानात परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number