नागपूर: टी-20 विश्वचषकाचे रणशिंग फुंकण्याआधीच भारतीय संघाने आपल्या इराद्यांची झलक जगाला दाखवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ‘टीम इंडिया’ने विजयाचा श्रीगणेशा करत 1-0 अशी दणदणीत आघाडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आणि न्यूझीलंडसमोर 239 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येच्या दडपणाखाली न्यूझीलंडचा संघ गडगडला आणि भारताने हा सामना 48 धावांनी खिशात घालत मालिकेत दिमाखात प्रवेश केला.
For his authoritative opening act, Abhishek Sharma bags the Player of the Match award ? Relive his knock ▶️ https://t.co/WSNLEfd35F#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @OfficialAbhi04 pic.twitter.com/3mCtrzuub2 — BCCI (@BCCI) January 21, 2026
अभिषेक शर्माची ‘अतिशबाजी’ आणि रिंकूचा ‘फिनिशिंग टच’
या सामन्याचे खरे हिरो ठरले ते युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि ‘फिनिशर’ रिंकू सिंग. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने अवघ्या 35 चेंडूंत 84 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीत पाच खणखणीत चौकार आणि आठ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अभिषेकने तब्बल 240 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने आपली जबाबदारी चोख पार पाडत 20 चेंडूंत नाबाद 44 धावा कुटल्या, ज्यामुळे भारताला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 238 अशी सर्वोच्च धावसंख्या उभारता आली.
A commanding performance! ?#TeamIndia win by 4⃣8⃣ runs in Nagpur to take a 1⃣-0⃣ lead in the 5-match T20I series ? Scorecard ▶️ https://t.co/ItzV352h5X#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BuAT0BluHk — BCCI (@BCCI) January 21, 2026
टॉप ऑर्डर गडगडली, पण सूर्याची संयमी साथ
एकीकडे अभिषेक शर्मा मैदानावर आग ओकत असताना, दुसरीकडे भारताची सुरुवात मात्र काहीशी डगमगती झाली होती. सलामीवीर संजू सॅमसन (10 धावा) आणि ईशान किशन (8 धावा) स्वस्तात माघारी परतले. काइल जैमीसनने भारताला सुरुवातीचे धक्के दिले. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्याने 32 चेंडूंत 22 धावा केल्या, पण मिचेल सॅन्टनरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मधल्या फळीत शिवम दुबे (9) आणि हार्दिक पांड्या (25) यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तरीही धावगती कायम राखण्यात भारत यशस्वी ठरला.
ग्लेन फिलिप्सची एकाकी झुंज अपयशी
239 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात तणावाखाली झाली. तरीही, ग्लेन फिलिप्सने एकहाती किल्ला लढवत भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 40 चेंडूंत 78 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामुळे काही काळ भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, 14 व्या षटकात फिलिप्स बाद होताच न्यूझीलंडच्या आशा मावळल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही.
टीम इंडियाची विजयाची मालिका सुरूच
भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी बळी मिळवत न्यूझीलंडला 20 षटकांत 190 धावांवर रोखले. वाढत्या धावगतीचा (Required Run Rate) दबाव आणि भारतीय क्षेत्ररक्षकांचा चपळपणा यामुळे किवी संघाला 48 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि काइल जैमीसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, पण ते भारताचा विजय रोखू शकले नाहीत. या विजयासह भारताने विश्वचषकापूर्वी आपली तयारी भक्कम असल्याचे सिद्ध केले आहे.
हेही वाचा: KDMC Mayor : महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं! कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर