PCB Sky Sports Clash: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राला राजकीय वादात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पीसीबीने सामन्यावर बहिष्काराची थेट धमकी दिली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 मधील विश्वचषक विजेते कर्णधार इम्रान खान यांच्या दोन मुलांची सुलेमान आणि कासिम खान यांची मुलाखत प्रसिद्ध क्रीडा वाहिनी 'स्काय स्पोर्ट्स'ने घेतली होती. या मुलाखतीचे प्रसारण रोखण्यासाठी पीसीबीने दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपूर्वी थेट स्काय स्पोर्ट्सशी संपर्क साधला. ही मुलाखत प्रसारित केली गेली, तर पाकिस्तानी क्रिकेट संघ दुपारच्या सत्रात मैदानावर खेळण्यासाठी उतरणार नाही, असा इशारा बोर्डाकडून देण्यात आला.
पीसीबीच्या धमकीवर स्काय स्पोर्ट्सचे ठाम पाऊल
एका आंतरराष्ट्रीय प्रसारकावर राजकीय कारणास्तव दबाव आणण्यासाठी थेट कसोटी सामन्याला ओलीस ठेवण्याचा हा प्रकार क्रिकेट जगतात अभूतपूर्व मानला जात आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समालोचक माईक अॅथरटन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्काय स्पोर्ट्सने सुरुवातीला या मुलाखतीचे प्रसारण काही काळ पुढे ढकलले. मात्र, नंतर प्रसारकाने नमते न घेता दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीदरम्यान ती 18 मिनिटांची मुलाखत प्रसारित केली. यानंतर पीसीबीची मोठी कोंडी झाली आणि कोणतीही नाट्यमय माघार किंवा बहिष्कार न टाकता पाकिस्तानी खेळाडू शांतपणे मैदानावर परतले अन् सामना सुरळीत पार पडला.
हेही वाचा – R Praggnanandhaa: चेस जगतात भारताचा नवा इतिहास; 21 वर्षीय आर. प्रज्ञानंद ठरला 'ग्रँड चेस टूर'चा नवा चॅम्पियन
मुलाखतीत सुलेमान आणि कासिम खान यांनी नेमके काय सांगितले?
लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये माईक अॅथरटन यांनी घेतलेली ही मुलाखत क्रिकेटशी संबंधित नसून केवळ राजकीय व मानवाधिकार मुद्द्यांवर आधारित होती. ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल, तुरुंगातील त्यांच्या एकांतवासाबद्दल आणि त्यांच्या डोळ्यांच्या समस्येबद्दल सुलेमान व कासिम यांनी चिंता व्यक्त केली. तसेच कुटुंबाला त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत राजकीय छळ आणि पुरेशा वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याचे आरोप त्यांनी केले. पाकिस्तानी प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमुळे पीसीबी आणि पाक प्रशासन प्रचंड अस्वस्थ झाले होते.