Hardik Pandya: आयपीएल 2026 मधून मुंबई इंडियन्सचा प्रवास संपल्यानंतर संघातील वातावरणाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः कर्णधार हार्दिक पांड्याच्या सोशल मीडिया हालचालींमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्सला अनफॉलो करणं, काही पोस्ट हटवणं आणि त्यानंतर पुन्हा संघाला फॉलो करणं यामुळे हार्दिक आणि फ्रेंचायझीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं स्वप्न अधिकृतपणे संपुष्टात आलं. या हंगामात संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अनेक सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या अपयशासाठी कर्णधार हार्दिक पांड्यालाही मोठ्या प्रमाणात जबाबदार धरलं जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.
याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत हार्दिकला काही सामन्यांसाठी बाहेर बसवलं आणि नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली. मात्र नेतृत्व बदलूनही संघाच्या नशिबात फारसा बदल झाला नाही. अखेर मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर पडावं लागलं.
सोशल मीडियावर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची चर्चा सुरू झाली. काही चाहत्यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील बदलांचे स्क्रीनशॉट शेअर करत मोठे दावे केले. काहींनी हार्दिक पुढील हंगामात दुसऱ्या संघात जाणार असल्याचं म्हटलं, तर काहींनी संघातील वरिष्ठ खेळाडूंशी त्याचे संबंध बिघडल्याचा अंदाज व्यक्त केला. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याच्या संभाव्य प्रवेशाबाबतही चर्चा रंगल्या.
मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिकने काही काळासाठी मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं होतं, पण त्यानंतर पुन्हा संघाला फॉलो केलं. त्यामुळे सध्या तरी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गंभीर वाद असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.
हार्दिक पांड्याची यंदाची आकडेवारीही चाहत्यांच्या नाराजीचं कारण ठरली. आठ सामन्यांत त्याने केवळ 146 धावा केल्या, तर गोलंदाजीत फक्त चार विकेट्स मिळवल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल करणार का? हार्दिक पांड्या संघात कायम राहणार की नवा निर्णय घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.