Zubin Bharucha: पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) संघात एक अत्यंत वादग्रस्त नियुक्ती समोर आली आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्या दयेच्या अर्जावर दया दाखवून स्वाक्षरी करणारे मुंबईचे माजी क्रिकेटपटू झुबिन भरुचा आता मुंबई इंडियन्सचे 'परफॉर्मन्स डायरेक्टर' (Director of Performance) बनले आहेत. आयपीएल 2027 च्या आगामी हंगामापूर्वी संघाची कामगिरी उंचावण्यासाठी भरुचा यांना ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या भूतकाळातील या वादग्रस्त स्वाक्षरीमुळे सोशल मीडियावर क्रिकेट वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, क्रीडाप्रेमींनी या निवडीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वादग्रस्त पार्श्वभूमी आणि सोशल मीडियावर संतापाची लाट
2008 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात कसाब मुख्य दोषी आढळला होता. 166 निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या आणि शेकडो लोकांना जखमी करणाऱ्या या दहशतवाद्याच्या दयेच्या अर्जावर भरुचा यांनी स्वाक्षरी केली होती. भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट फ्रँचायझींपैकी एका संघात इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करताना अशा संवेदनशील भूतकाळाचा विचार केला गेला नाही का, असा सवाल युजर्स उपस्थित करत आहेत. या निर्णयामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले असून तीव्र चर्चा रंगली आहे.
राजस्थान रॉयल्स ते मुंबई इंडियन्स; भरुचा यांची नवीन भूमिका
राजस्थान रॉयल्सशी 2008 मधील पहिल्या आयपीएल हंगामापासून दीर्घकाळ जोडलेले राहिलेले झुबिन भरुचा आता मुंबई इंडियन्सच्या गोटात दाखल झाले आहेत. 'क्रिकइन्फो'च्या अहवालानुसार, भरुचा प्रामुख्याने 'ऑफ-सीझन' दरम्यान भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतील. ते मुंबईतील केंद्रावर सहाय्यक प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्यासोबत काम करणार असून, खेळाडूंचे कौशल्य सुधारणे आणि कोचिंग स्टाफसोबत समन्वय साधणे हे त्यांचे मुख्य काम असेल. भरुचा यांनी आपल्या कामाला सुरुवातही केली असून, सध्या ते दक्षिण आफ्रिकेत मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंच्या गटासोबत प्रवास करत आहेत.
हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! धोनीचा 'हा' विक्रम मोडीत काढत परदेशात ठरला नंबर वन यष्टिरक्षक
प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ते हाय-प्रोफाइल कोच
झुबिन भरुचा हे मुंबईचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी 1992-93 च्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 1994-95 मध्ये आपली खेळाडू म्हणून कारकीर्द संपवण्यापूर्वी त्यांनी 17 प्रथम श्रेणी सामने आणि 11 'लिस्ट ए' सामने खेळले. त्यानंतर त्यांनी कोचिंग आणि संघ व्यवस्थापनात पाऊल टाकले. राजस्थान रॉयल्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर आता ते मुंबई इंडियन्सला नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.