Prithvi Shaw Breakup: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आकृती अग्रवाल यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साखरपुड्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आकृती अग्रवालने सोशल मीडियावर एक भावूक ‘ब्रेकअप’ पोस्ट शेअर करत त्यांच्यातील नाते संपल्याची अधिकृत माहिती दिली. भविष्यातील भिन्न उद्दिष्टे, परस्पर भिन्न परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी हा निर्णय परस्पर संमतीने घेतला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये केली होती नात्याची घोषणा; मार्च 2026 मध्ये झाला होता साखरपुडा
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपल्या प्रेमाची कबुली देत नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2026 रोजी अत्यंत थाटामाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. पृथ्वी शॉने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले होते. मात्र, साखरपुड्याला 6 महिने पूर्ण होत असतानाच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असून, आता दोघांचे रस्ते कायमचे वेगळे झाले आहेत.
हेही वाचा – कोणता सिनेमा कधी आणि कसा प्रेक्षकांसमोर येणार? प्रीती झिंटा, सुनील शेट्टींसह 18 जणांवर महत्त्वाची जबाबदारी
आकृती अग्रवालची इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट; अफवा पसरवण्याचे टाळण्याचे आवाहन
इन्स्टाग्रामवर आपली भूमिका मांडताना आकृतीने लिहिले, “अत्यंत जड अंतःकरणाने मी हे सांगू इच्छिते की, भविष्यातील भिन्न उद्दिष्टे आणि परिस्थितींमुळे मी आणि माझ्या होणाऱ्या जोडीदाराने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जरी आमच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही प्रेम आणि आपुलकी असली, तरी आमच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत हे आम्ही स्वीकारले आहे.” यासोबतच तिने दोघांच्याही पुढील वाटचालीस शांतता आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नात्याबाबत तर्क-वितर्क न लावण्याची चाहत्यांना विनंती
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरील काही पोस्ट्समुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता आकृतीच्या अधिकृत विधानामुळे या चर्चांवर पूर्णविराम मिळाला आहे. नात्याच्या समाप्तीचे नेमके कारण स्पष्ट न करता, आकृतीने या कठीण काळात प्रत्येकाने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे नम्र आवाहन केले आहे. तसेच या निर्णयामागच्या कारणांवर कोणीही उगीच अंदाज किंवा तर्क-वितर्क लावू नयेत, असेही तिने पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.