FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जेतेपदासाठी आज अंतिम लढत; वाचा कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना

आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉलच्या इतिहासात ही पहिलीच अशी वेळ आहे, जिथे दक्षिण अमेरिका आणि युरोप खंडाचे विद्यमान चॅम्पियन्स थेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेकांना आव्हान देतील.

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जेतेपदासाठी आज अंतिम लढत; वाचा कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉल जगतातील दोन महासत्ता म्हणजेच गतविजेता अर्जेंटिना आणि बलाढ्य स्पेन २०२६ च्या फिफा विश्वचषक जिंकण्यासाठी आमनेसामने ठाकणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉलच्या इतिहासात ही पहिलीच अशी वेळ आहे, जिथे दक्षिण अमेरिका आणि युरोप खंडाचे विद्यमान चॅम्पियन्स थेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेकांना आव्हान देतील. दोन्ही देशांसाठी हा सामना एका नव्या सुवर्णकाळाची सुरुवात ठरणार असून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे डोळे या ऐतिहासिक द्वंद्वाकडे लागले आहेत.

विजेतेपदाचा अनोखा चौकार की जागतिक विक्रम?

या अंतिम सामन्यात दोन्ही संघांसमोर फुटबॉल इतिहासाची पाने नव्याने लिहिण्याची मोठी संधी आहे. अर्जेंटिनाने हा सामना जिंकल्यास सलग 4 मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खिशात टाकणारा तो जगातील पहिलाच संघ ठरेल. दुसरीकडे, युरो 2024 चा विजेता स्पेन तब्बल 16 वर्षांनंतर आपले दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे. विशेष म्हणजे, मार्च 2024 पासून सलग 37 सामन्यांमध्ये अपराजित राहिलेल्या स्पॅनिश संघाला रविवारी मिळणारा एक विजय आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा जागतिक विक्रम मिळवून देऊ शकतो.

हॉलिवूड स्टार्स आणि बीटीएसचा झगमगाट

फुटबॉलच्या थरारासोबतच हा अंतिम सामना एका भव्य मनोरंजन सोहळ्याचा अनुभव देणार आहे. मुख्य सामना सुरू होण्याच्या 90 मिनिटे आधी उद्घाटनाचा एक ग्लॅमरस सोहळा रंगेल, ज्यामध्ये हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ, इंटरनेट सेन्सेशन आयशोस्पीड (IShowSpeed) आणि आघाडीचा गायक पोस्ट मेलोन थिरकताना दिसतील. याशिवाय, सामन्याच्या पहिल्या हाफनंतर होणाऱ्या प्रसिद्ध 'हाफटाइम शो'मध्ये रॉक बँड कोल्डप्लेचा ख्रिस मार्टिन, जस्टिन बीबर, पॉप क्वीन मॅडोना, शकिरा आणि जगप्रसिद्ध कोरियन बॉय बँड बीटीएस (BTS) आपल्या परफॉर्मन्सने स्टेडियम डोक्यावर घेतील.

भारतात कधी, कुठे आणि कसा पाहायचा हा सामना?

न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक 'मेटलाइफ स्टेडियम'वर हा महामुकाबला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजता (IST) या सामन्याला सुरुवात होईल. स्लोव्हेनियाचे ख्यातनाम रेफरी स्लाव्हको विन्चिच या सामन्यात मुख्य पंचांची भूमिका पार पाडतील. अंतिम शिटी वाजल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते विजेत्या संघाला विश्वचषक ट्रॉफी प्रदान केली जाईल.

हेही वाचा – Japan Open Super 750: 2 वर्षांचा दुष्काळ संपला! अकाने यामागुचीला धूळ चारीत सिंधू बनली जपान ओपनची 'क्वीन'

भारतातील प्रेक्षक या सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर Unite8 Sports 1, Unite8 Sports 1 HD, Unite8 Sports 2 आणि Unite8 Sports 2 HD वाहिन्यांवर पाहू शकतात. तसेच, हा सामना 'दूरदर्शन स्पोर्ट्स'वर पूर्णपणे मोफत प्रसारित केला जाईल. डिजिटल युजर्स ZEE5 ॲप आणि वेबसाइटवर इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number